बोंडगावदेवी : कोरोना महामारीत शाळा बंद, विद्यार्थी घरच्या घरी, शैक्षणिक वातावरणाची लिंक तुटली. विद्यार्जनापासून ग्रामीण भागातील सामान्य विद्यार्थी दुरावू नये यासाठी जवळच्या चान्ना बाक्टी येथील मिलिंद विद्यालयाने गावागावात जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्याचा ध्यास घेतला.
‘चला करुया अभ्यास’ या शैक्षणिक धोरणांतर्गत चान्ना बाक्टी येथील मिलिंद विद्यालयाने शाळा बाहेर विद्यार्थ्यांच्या गावात, परिसरात जाऊन शैक्षणिक अभ्यासक्रम शिकविण्याचा उपक्रम सुरू केला. सोमलपूर येथील इयत्ता ५ वी ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची समाज मंदिरात शाळा भरविण्यात आली. चला करुया अभ्यास या उपक्रमाच्या प्रारंभप्रसंगी प्राचार्य राजन बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते. गावातील विद्यार्थ्यांना एकत्र बोलाविण्यात आले. विद्यालयाच्या शिक्षकांनी विषयानुरूप ज्ञानदानाचे कार्य केले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कार्य खंडित राहू नये, अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना ज्ञानाचे डोस पाजण्याचा प्रयत्न मिलिंद विद्यालयाच्यावतीने करण्यात येत असल्याचे प्राचार्य राजन बोरकर यांनी सांगितले. याप्रसंगी विद्यालयाचे इतर शिक्षक उपस्थित होते.