लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर १३ डिसेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, तर ओबीसी आरक्षणावर सर्वोच्य न्यायालयात १३ डिसेंबरलाच सुनावणी होणार आहे. या सुनावणीवरच या निवडणुकांचे भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे निवडणुका रद्द होतात, की ओबीसी जागा वगळून होतात हे महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी तोपर्यंत वेट ॲण्ड वॉचची भूमिका घेतली असून, उमेदवारांनासुद्धा सबुरीचा सल्ला देत मतदारांच्या संपर्कात राहण्यास सांगितले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २७ टक्के ओबीसी आरक्षणाला सर्वोच्य न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत व ग्रामपंचायतच्या निवडणुका या ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे; पण या निर्णयाला सर्वच राजकीय पक्षांनी विरोध केला असून, ओबीसी जागा वगळून या निवडणुका न घेता सर्वच निवडणुका स्थगित करून यावर निर्णय होईपर्यंत निवडणुका न घेण्याची मागणी केली आहे, तर ओबीसी आरक्षणावर १३ डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालय काय निकाल देते यावरच या निवडणुकांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल झाले असले तरी उमेदवारांनी प्रचाराला अद्यापही सुरुवात केली नाही. निवडणुकांचा माहोल पूर्णपणे थंडावला असून, लक्ष असू द्यालासुद्धा तूर्तास विराम दिला आहे. उमेदवारदेखील आपल्या कार्यकर्त्यांना तूर्तास सबुरीचा सल्ला देत असून, १३ डिसेंबरनंतर पाहू भाऊ, असे सांगत आहेत.
नेते म्हणतात मतदारांच्या संपर्कात राहा- ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून निवडणुका घेण्यास सर्वच राजकीय पक्षांनी विरोध केला आहे, तर ओबीसी आरक्षण नाही तर निवडणूृक नाही अशीच भूमिका घेतली आहे, तर १३ डिसेंबरला सर्वोच्य न्यायालय काय निकाल देते यानंतर या निवडणुकीच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. त्यामुळे उमेदवार आणि त्यांचे समर्थकदेखील शांत आहेत. मात्र, शांत न राहता मतदारसंघातील मतदारांच्या संपर्कात राहण्याचा सल्ला सर्वच पक्षांच्या नेत्यांनी उमेदवारांना दिल्याची माहिती आहे. खानावळीवरील गर्दी झाली कमी - ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे उमेदवारांनीसुद्धा आता सावध पवित्रा घेतला आहे. आठ दिवसांपूर्वी आपल्या समर्थक व कार्यकर्त्यांना दररोज खानावळीत पार्ट्या दिल्या जात होत्या. त्यामुळे खानावळीतील गर्दीसुद्धा वाढली होती; पण मागील तीन- चार दिवसांपासून ही गर्दीदेखील कमी झाल्याचे चित्र आहे.
उमेदवारांसह मतदारांच्या नजरा निर्णयाकडेच - ओबीसी आरक्षणासंदर्भात १३ डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालय नेमका काय निर्णय देते. ओबीसी जागा वगळून निवडणुका घ्या म्हणते, की सर्वच निवडणुका स्थगित करून एकत्रित घेण्याचे निर्देश देते, याकडेच सध्या सर्व पक्षांचे उमेदवार आणि मतदारांच्यासुद्धा नजरा लागल्या आहेत.सर्वच म्हणतात आम्ही ओबीसी हितैशी - ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून निवडणुका घेऊ नये असाच सूर सर्वच राजकीय पक्षांनी आवळला आहे. काही राजकीय पक्षांना ते पटत जरी नसले तरी त्यांना निवडणुकीतील समीकरणाचा विचार करून तसे म्हणावे लागत आहे. त्यामुळे सर्वांनीच आता ओबीसी हितैशी असल्याचा सूर आवळला आहे.