आॅनलाईन लोकमतगोंदिया : दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या क्रीडा गुणांचे प्रदर्शन या स्पर्धेतून दिसून आले. या क्रीडा स्पर्धेतून विविध खेळ प्रकारात विद्यार्थ्यांनी त्यांच्या अंगीसुध्दा चांगले क्रीडा कौशल्य असल्याचे दाखवून दिले. हे विद्यार्थी दिव्यांग जरी असले तरी त्यांच्या आयुष्यामध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.देवरी येथे २३ ते २५ मार्चदरम्यान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, अपंग कल्याण आयुक्तालय पुणे व कृष्णा सहयोगी तंत्रशिक्षण संस्था देवरी यांच्या वतीने दिव्यांगांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. महोत्सवाच्या समारोपप्रसंगी विविध स्पर्धेचे पारितोषिक वितरण पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून सुमन बिसेन, पं.स. सभापती सुनंदा बहेकार, अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड, कृष्णा सहयोगी तंत्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष झामिसंग येरणे, भाजपा संघटन मंत्री विरेंद्र अंजनकर, नगरसेवक यादोराव पंचमवार, प्रविण दहीकर, रतन वासनिक उपस्थित होते.बडोले म्हणाले, दिव्यांग व्यक्तींसाठी क्रीडा प्रबोधिनी स्थापन करण्यात येईल. या प्रबोधिनीच्या माध्यमातून त्यांना चांगले प्रशिक्षण देण्यात येईल.भविष्यात हे विद्यार्थी आॅलंपीक स्पर्धेत कसे सहभागी होतील, यादृष्टीने आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.या वेळी कृष्णा सहयोगी तंत्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष झामिसंग येरणे यांनीही विचार व्यक्त केले. पालकमंत्री बडोले यांना यवतमाळ जिल्ह्यातील पोफाळी येथील कला शिक्षक प्रल्हाद शिरुले यांनी काढलेल्या लुईस ब्रेल व हेलन केलर यांची चित्रे भेट म्हणून देण्यात आली.स्पर्धेतील विजेत्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. मुकबधीर प्रवर्गात प्रथम पुणे जिल्हा, द्वितीय नागपूर जिल्हा, तृतीय यवतमाळ जिल्हा.अस्थीव्यंग प्रवर्गात प्रथम भंडारा जिल्हा, द्वितीय उस्मानाबाद जिल्हा, तृतीय नागपूर जिल्हा. अंध प्रवर्गात प्रथम अमरावती जिल्हा, द्वितीय पुणे जिल्हा, तृतीय नागपूर जिल्हा. मतिमंद प्रवर्गात प्रथम अमरावती जिल्हा, द्वितीय नागपूर जिल्हा, तृतीय पुणे जिल्हा. बहुविकलांग प्रवर्गात प्रथम नागपूर जिल्हा, द्वितीय बुलढाणा जिल्हा, तृतीय लातूर जिल्हा यांनी पारितोषिक पटकाविले.स्पर्धेत राज्यातून जवळपास २५०० विद्यार्थी व त्यांचे शिक्षक सहभागी झाले होते. स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल कृष्णा सहयोगी तंत्रशिक्षण संस्थेला पालकमंत्री बडोले यांनी ट्रॉफी देवून सन्मानित केले. या स्पर्धेत राज्यभरातील दिव्यांग स्पर्धक सहभागी झाले होते. प्रास्ताविक अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी मांडले. संचालन जवाहर गाढवे यांनी केले. आभार प्रादेशिक उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाला देवरी शहरातील, परिसरातील गावातील नागरिक तसेच खेळाडूंचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.