गिरीधारी कुंभरे यांचे प्रतिपादन: चापटी येथे बिरसा मुंडा शहीद दिन साजरा लोकमत न्यूज नेटवर्क बोंडगावदेवी : आपल्या अल्पश: आयुष्यात भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला एक प्रेरणादायक नवी दिशा दिली. आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्कासाठी आपल्या हयातीमध्ये लढले. बिरसा मुंडा यांच्या संघर्षमय बलिदानामुळे आदिवासी समाजाला खरा न्याय मिळाला. मूळ निवासी असलेल्या आदिवासी समाजाने आपल्या सर्वांगीण उन्नतीसाठी क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांचा संघर्षमय आदर्श सदोदित स्मरणात ठेवून समाज बांधवाना प्रगती साधणे सहज शक्य असल्याचे प्रतिपादन प्रा. गिरीधारी कुंभरे यांनी केले. चापटी येथील भगवान बिरसा मुंडा शहीद दिन समारंभात आदिवासी समाज बांधवाना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोर भगवान बिरसा मुंडा शहीद दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच जागेश्वर कोरे, मार्गदर्शक म्हणून प्रा. गिरीधारी कुंभरे, दिलीप तुमडाम उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते माधोराव कुंभरे, गोवर्धन सयाम, रामकृष्ण पुराम, गोपाल मडावी उपस्थित होते. समाज बांधवाना हितोपदेश करताना प्रा. कुंभरे म्हणाले की, आदिवासी समाजाला त्यांचा हक्क मिळावा समाजाची प्रगती व्हावी यासाठी शेवटपर्यंत बिरसा मुंडा लढले. समाजाच्या अधिकारासाठी त्यांना जीवनाची आहुती द्यावी लागली. आपल्या आदिवासी समाजाचे क्रांतीवीर असलेले भगवान बिरसा मुंडा हेच आपले खरे आदर्श भगवान असल्याचे सांगितले. दिलीप तुमडाम म्हणाले की, समाज बांधवानी आपली प्रगती साधण्यासाठी बिरसा मुंडा यांचा क्रांतीकारी आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. गुलामगीरीची वृत्ती झिडकाराने मुलगा शिक्षणापासून वंचीत ठेवू नये असा विचारी बाणा समाजाने अंगीकारून प्रगती साधावी. भगवान बिरसा मुंडा यांचा त्याग सदोदित स्मरणात ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी गावातील आदिवासी समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
बिरसाच्या आदर्शाने प्रगती साधावी
By admin | Published: June 10, 2017 2:04 AM