गोंदिया : संयुक्त सक्रिय कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध व नियमित संनियंत्रण अभियान अंतर्गत आजादी का अमृत महोत्सवाचे औचित्य साधून गोंदिया शहरात देखील क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेबाबत केटीएसच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी सांगितले की, क्षयमुक्त गोंदिया ही मोहीम १ जुलैपासून सुरुवात करण्यात आली. ३१ ऑक्टोबरपर्यंत ही शोध मोहीम चालू राहील. या कालावधीत गोंदिया शहरातील वाॅर्डावाॅर्डातून आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका क्षय रोगाची लक्षणे असलेल्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना उपचाराखाली आणणार आहेत. या मोहिमे अंतर्गत मोफत छातीचा डिजिटल एक्सरे क्षयरोग उपचार केंद्र केटीएस कॅम्पस येथे काढून मिळत आहे. तरी नागरिकांनी क्षयरोगाची लक्षणे लपवू नये असे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी कळविले आहे. याच केंद्रात सीबी नॅट या महागड्या मशीनद्वारे उच्च तंत्रज्ञान वापरुन क्षयरोगाचे तत्काळ निदान करण्याची सोय जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. राज पराडकर यांच्या निर्देशनात केलेली आहे. या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी केले. गोंदिया शहरात जरी क्षयरुग्णांची संख्या मोठी असली तरी नागरिक स्वत:हून समोर येऊन तपासणी करुन घेण्यास तयार नाहीत म्हणून डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी नुकतेच कुंभारेनगर येथील अर्बन हेल्थ सेंटर येथे बैठक आयोजित करुन आशा निहाय व वाॅर्ड निहाय आढावा घेतला व संशयित क्षय रुग्णांचे तातडीने स्पुटम नमुने व मोफत एक्सरे तपासणी करुन घेण्याच्या सूचना दिला. यावेळी डॉॅ. विजय कुमार, आशा समन्वयक संजय दोनोडे व तालुका नियंत्रण पथकाचे कर्मचारी उपस्थित होते.