पत्र कुठे दडले व दोषी कोण? : शिक्षक नेतराम माने निलंबन प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्ह्यात गाजलेला नेतराम माने निलंबन प्रकरणाच्या समस्येचे समाधान झाले नसून जिल्हा परिषद दिवसेंदिवस चर्चेत येत आहे. विभागीय आयुक्ताच्या पत्राकडे दुर्लक्ष, ग्रामविकास मंत्रालयाच्या पत्राकडे दुर्लक्ष व न्यायालयाची अवमानना या सर्व बाबी जि.प. च्या अंगलट येण्याची शक्यता दिसून येत आहे. तिरोडा तालुक्याच्या जि.प. उच्च प्राथमिक शाळा बेरडीपार (काचे.) येथे कार्यरत शिक्षक नेतराम माने यांना घरगुती खासगी विद्युत प्रकरणाचा (खोटा) आधार घेवून सुडबुध्दीने व जातीवादातून आॅगस्ट २०१५ मध्ये निलंबित केले होते. या प्रकरणात संबंधित पुरावे जि.प.गोंदिया आणि विभागीय आयुक्त नागपूर यांना देण्यात आले होते. याची दखल विभागीय आयुक्तांनी वेळोवेळी घेवून अहवाल मागितले होते. मात्र, त्यांच्या एकाही पत्राकडे लक्ष देण्यात आले नाही. विभागीय आयुक्त नागपूर यांनी मुकाअ यांच्या नावे पत्र क्रं. ११४६/५४६/२०१५ दिनांक २९ सप्टेंबर २०१५, नोव्हेंबर व डिसेंबर २०१५ ला दोन पत्र, जानेवारी २०१६ ला एक पत्र, पाचवे पत्र क्रं. २२३/१४०/२०१६ दिनांक १७ फेब्रुवारी २०१६, सहावे पत्र क्रं. ६७९/४३५/२०१६ दि. १४ जून २०१६, सातवे पत्र क्रं. १२७०/५३०/२०१६ दिनांक ४/११/२०१६, आठवे पत्र क्रं. २०३/३७७/२०१७ दि. ६ मे २०१७ आणि नववे पत्र क्रं. ७११/१९२१ दिनांक १४ जून २०१७ ला पाठविले. तसेच जिल्हा परिषद स्तरावरुन सद्यस्थिती कार्यवाहीचा अहवाल मागितला. तसेच परस्पर सदर शिक्षकाला लेखी पत्राद्वारे माहिती कळवावी, असे सांगितले होते. विभागीय आयुक्त नागपूर यांनी मुकाअ यांनी असेही कळविले होते की, या पत्रावर किंवा कार्यवाहीत जि.प.चे अधिनस्त कर्मचारी व अधिकारी निष्काळजीपणा करीत असतील तर त्यांच्यावर आपल्या स्तरावर कारवाई करण्यात यावी. असे असताना जि.प.शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी व सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण आयुक्ताच्या पत्राला केराच्या टोपलीत घातले. अर्थात कोणत्याही पत्राचा अहवाल विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आला नाही व त्या शिक्षकाला सुध्दा एकही पत्र देवून कळविण्यात आले नाही. विभागीय आयुक्ताच्या पत्रासंबंधी व केलेल्या पत्रावर कारवाईसंबधी जि.प.गोंदिया येथे शिक्षक नेतराम माने यांनी संपर्क केला तेव्हा एक-दोन पत्र मिळाले. उर्वरित पत्र सामान्य प्रशासन विभागात असतील असे उडवा-उडवीचे उत्तरे देण्यात आले. सामान्य प्रशासन विभागात संपर्क साधला असता आपण शिक्षण विभागाकडे पाठविल्याचे सांगण्यात आले असल्याचे माने यांनी सांगितले. शिक्षक नेतराम माने यांनी सांगितले की, विभागीय उपायुक्त नागपूर यांचे तीन पत्र वगळता संपूर्ण सहा पत्र मिळाले आहेत. परंतु त्या पत्रावर जि.प.ने कोणती कार्यवाही केली, पत्र कोठे दडविण्यात आले याची माहिती आपल्याला नसून विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात कसलाही अहवाल पाठविण्यात आला नाही, असे आयुक्तालयातून कळविण्यात आले. विभागीय आयुक्ताचे पत्र दडवून ठेवणाऱ्यांवर आणि आयुक्तांनी कळविल्यावर कारवाई न करण्यामागे कारणे शोधून मुकाअ जि.प.गोंदिया यांनी चौकशी नेमून दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शिक्षण विभाग व साप्रवि विभाग दोषी विभागीय आयुक्ताच्या पत्रांकडे दुर्लक्ष करुन केराच्या टोपलीत घालणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी जि.प.च्या दोन्ही सभागृहात केली जाणार असल्याची माहिती काही पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. आयुक्तांचे पाठविण्यात आलेले मुकाअ यांच्या नावाचे पत्र कोण दडवतो, कोठे गेले, अहवाल का पाठविण्यात आले नाही, ही आश्चर्याची बाब असल्याचे सांगण्यात आले. पाठविण्यात आलेले पत्र साप्रवि जि.प.गोंदिया येथील अधिकाऱ्याला दबावाखाली वरिष्ठ सहायक श्याम लिचडे, शिक्षण विभागातील कक्षाधिकारी दिवाकर खोब्रागडे, सहायक किंवा शिक्षणाधिकाऱ्यांनी जाणून दडवण्यात आले असावे, अशी प्रतिक्रिया शिक्षक माने यांनी व्यक्त केली आहे. विभागीय आयुक्ताकडे तक्रार विभागीय आयुक्त नागपूर यांना पत्राद्वारे कोणत्याही पत्राची माहिती जि.प.ने संबंधित शिक्षक नेतराम माने यांना दिली नसल्याचे सांगून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. विभागीय आयुक्त नागपूर विभाग नागपूर कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विभागीय आयुक्ताच्या पत्राद्वारे कोणता कार्यवाही अहवाल पाठविण्यात आला, ही माहिती व अहवाल प्रति मिळाव्या यासाठी माहिती अधिकाराखाली माहिती मागण्यात आली आहे.
आयुक्तांच्या पत्राकडे दुर्लक्ष अंगलट येणार
By admin | Published: June 29, 2017 1:11 AM