अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दारु, तंबाखू, गुटखा आदीचे व्यसन अलीकडे तरुणपिढीमध्ये वाढत आहे. याला शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी सुध्दा अपवाद नाहीत. परिणामी दरवर्षी कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत. व्यसनाचे व्यक्तीच्या आरोग्य व समाजावर सुध्दा परिणाम होत आहे. हे चित्र बदलण्याकरिता व व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील सर्व शाळांमधील अडीच लाख विद्यार्थी एक पत्र व्यसनमुक्तीसाठी ४ फेब्रुवारीला लिहिणार आहेत.जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह इतर खासगी शाळांमध्ये सुध्दा हा उपक्रम ४ फेब्रुवारीला राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम राबविण्यापूर्वी विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याचे फायदे, तंबाखूमुक्तीचे मार्ग उपाय, तंबाखू नियंत्रण कायद्याचे पाच मुख्य नियम, तंबाखूमुक्त शाळा याबद्दलची माहिती शाळेतील प्रार्थनेनंतर विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांकडून आपल्या व्यसन करणाऱ्या भावासाठी, मित्रासाठी आणि कुटुंबातील सदस्यांसाठी व्यसनमुक्तीवर नाविन्यपूर्ण पत्र लिहिण्याची पूर्व तयारी करुन घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे पत्र लेखनासाठी टाकाऊ वस्तू, पाने, फुले, जुने ग्रिटींग कार्ड आदींचा वापर विद्यार्थी करणार आहेत. एक पत्र व्यसनमुक्तीसाठी हा नाविण्यपूर्ण उपक्रम असून विद्यार्थ्यांवर शालेय जीवनापासूनच व्यसनमुक्तीचे संस्कार व्हावे हा देखील या मागील हेतू आहे. विद्यार्थ्यांनी पत्र लिहिल्यानंतर ते पत्र विद्यार्थी त्यांच्या कुटुंबातील सदस्य, शेजारी व व्यसन करणाऱ्या व्यक्तींना वाचून दाखविणार आहेत. व्यसन करणाऱ्यांना व्यसनाधिनेचे दुष्परिणाम सांगून त्यांच्याकडून यापुढे मी कोणतेही व्यसन करणार नाही असे वचन घेणार आहेत. येथेच विद्यार्थ्यांची जबाबदारी संपणार नसून ज्या व्यक्तींना व्यसनमुक्त होण्याचे शपथ दिली त्यांनी खरोखरच व्यसन सोडले की नाही, याचा कमीत कमी सहा महिने पाठपुरावा करणार आहेत. शाळेतील किती विद्यार्थ्यांनी किती जणांना पत्र लिहिले याची सुध्दा नोंद ठेवली जाणार आहे. या उपक्रमाची प्रभाविपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने सर्व शाळांना दिल्याची माहिती आहे.विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र भूषण प्रमाणपत्राने गौरवएक पत्र व्यसनमुक्तीसाठी या उपक्रमातंर्गत विद्यार्थी व्यसनमुक्तीवर पत्र लिहून त्याचे वाचन व्यसन करणाºया व्यक्तीसमोर करणार आहे. तसेच त्यांना व्यसनाचे दुष्परिणाम आणि त्याचे समाजाचे होणारे परिणाम पटवून देतील.यानंतर त्यांच्याकडून व्यसन सोडण्याचे वचन घेवून त्याचा सहा महिने पाठपुरावा करतील. त्यानंतर व्यसन सोडण्यासाठी यशस्वी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सलाम मुंबई फाऊंडेशनतर्फे महाराष्ट्र भूषण हे प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.
शाळेच्या सूचना फलकावर माहितीएक पत्र व्यसनमुक्तीसाठी या उपक्रमातंर्गत शाळेतील किती विद्यार्थ्यांनी पत्र लिहिली आणि त्यानंतर याचा पाठपुरावा घेतला. याची संख्या प्रत्येक शाळेतील सूचना फलकावर लिहून ठेवली जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक तालुक्यातील माहिती गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे गोळा केली जाणार आहे. .........