चरण चेटुले
केशोरी : येथील पोलीस ठाण्यात उभारण्यात आलेले सुसज्ज वाचनालय या आदिवासीबहुल, दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आधार ठरत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संदीप इंगळे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून वाचनालयातील पुस्तक साठा वाढवून सुसज्ज वाचनालयाची निर्मिती केली असून वाचनालयात स्वतंत्र अभ्यासिका हा उपक्रम राबविणे सुरू केले आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हवी ती सुविधा वाचनालयाच्यारूपाने उपलब्ध करून दिल्याचे सांगताना ठाणेदार इंगळे यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून येत आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी आणि यासंदर्भात विद्यार्थ्यांना उद्भवणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी अनुभवी व उच्चविभूषित असलेल्या अधिकाऱ्यांचे पथक तयार करून तरुण-तरुणींना मार्गदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. गोठणगाव आणि भरनोली येथील सशस्त्र दूरक्षेत्रात (एओपी) सुद्धा असे मार्गदर्शक पथक कार्यरत करण्यात आले आहे. या भागातील जास्तीत जास्त तरुण-तरुणी शासकीय सेवेत लागावेत, ही भावना ठेवून सतत प्रयत्न केले जात असल्याचे इंगळे यांनी सांगितले. यामुळेच केशोरीसह परिसरातील अनेक विद्यार्थ्यांसाठी वाचनालय स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आधार बनले असल्याचे दिसत आहे.