गोंदिया: दारूपिऊन घरी आलेल्या लहान भावाला मोठा भाऊ रागावत असल्याने याचा राग मनात धरून मोठ्या भावाचा धारदार शस्त्राने खून करणाऱ्या लहान भावाला जिल्हा न्यायालय-२ व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही सुनावणी ३१ जानेवारी रोजी जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.डी.खोसे यांनी केली आहे. भरत मदनकर (६२) रा. सौदंड ता. सडक-अर्जुनी जि. गोंदिया असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी भरत मदनकर रा. सौंदड याचा मृतक पंढरी धोंडू मदनकर हा सख्खा भाऊ होता. आरोपी व मृतक यांच्या शेतीची हिस्से-वाटणी झाली. ते एकमेकांच्या लगत होते. आरोपी दारूपिऊन घरी आल्यावर मृतक पंढरी (७२) हा कधीकधी त्याला रागवत होता. त्यामुळे आरोपी हा पंढरी यांचा राग धरून चिड करीत होता. त्यांच्याशी बोलत नव्हता. त्याचाच राग मनात धरून ५ जून २०१९ रोजी आरोपीने पंढरी धोंडू मदनकर याला शेतावर एकटा पाहून धारदार शस्त्राने डोक्यावर मारून ठार केले होते. पंढरी यांची पत्नी सुमित्रा मदनकर ही दुपारी २:३० वाजताच्या दरम्यान शेतावर गेली. तेव्हा त्यांनी हा प्रकार पाहिला. पंढरी हे शेतावरील झोपडीमध्ये जमिनीवर मृतावस्थेत आढळले. यासंदर्भात डुग्गीपार पोलिसांनी आरोपीविरूध्द भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद केला होता. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक विजय पवार यांनी केला होता. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात व पोलीस निरिक्षक विजय पवार यांच्या देखरेखीत पैरवी पोलीस हवालदार रविशंकर चौधरी यांनी केली आहे. ११ साक्षदार तपासलेआरोपीविरूध्द दोष सिध्द करण्यासाठी सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता महेश एस. चंदवानी यांनी एकुण ११ साक्षदारांची साक्ष न्यायालयासमोर नोंदवून घेतली. एकंदरित आरोपीचे वकील व सरकारी वकील महेश चंदवानी यांच्या युक्तीवादानंतर कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय अहवाल या आधारावर जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. डी. खोसे यांनी आरोपीविरूध्द सरकारी पक्षाचा पुरावा ग्राहय धरून आरोपीला कलम ३०२ अतंर्गत आजन्म सश्रम कारावास व २ हजार रूपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास ३ महिन्याचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.