गोंदिया : पती-पत्नीचा पैशावरून वाद सुरू होता. या वादात शिवीगाळ करणाऱ्या बहीण जावयाला समज देत असताना बहीण जावयाने आपल्या साळ्याच्या पोटात चाकू भोसकून १ जून रोजी दुपारी २.३० वाजता खून केला होता. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथील गवस महम्मद शेख (५१) यांचा खून करणाऱ्या आरोपी कदीर रशीद शेख (४५) रा. प्रतापगड याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही सुनावणी ९ नोव्हेंबर रोजी जिल्हा व प्रमुख सत्र न्यायाधीश एस.ए.ए.आर. औटी यांनी केली.
गवसची बहीण सलमा हिला गावातच लग्न करून दिले. सलमाचा पती आरोपी कदीर रशीद शेख (४५) रा. प्रतापगड हा आपल्या पत्नीसोबत पैसे दे म्हणून भांडण करीत होता. त्या भांडणाच्या वेळी त्याचा मुलगा आरिफ शेख बाहेरून घरी आला. त्यावेळी त्यानेही वडिलांना तू कशाला पैसे मागतोस, असे बोलला आणि गावातील चौकाकडे निघून गेला. त्यांच्यात वाद सुरूच होता. या वादात आरोपी कदीर जोराजोराने शिवीगाळ करीत असल्याने गवस महम्मद शेख यांनी शिवीगाळ का करतोस, असे म्हटले असता, आरोपी हा अंगणात जाऊन गवसला मारायला लागला. त्याच्या कंबरेला खोचून ठेवलेल्या चाकूने गवसच्या पोटात घाव घातले. यात तडफडून गवसचा मृत्यू झाला.
कदीर नेहमीच कंबरेला चाकू खोचून ठेवत असतो. नाजिया गवस मोहम्मद शेख रा. प्रतापगड यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक बाबू मुंडे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप इंगळे यांनी केला होता. या प्रकरणावर ९ नोव्हेंबर रोजी जिल्हा व प्रमुख सत्र न्यायाधीश एस.ए.ए.आर. औटी यांनी सुनावणी केली. आरोपीला जन्मठेप व १०० रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास सात दिवसाचा साधा कारावास ठोठावला आहे. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून सतीश घोडे यांनी काम पाहिले. न्यायालयीन कामकाजासाठी अनिरुद्ध रामटेके यांनी सहकार्य केले.