गोंदिया : साप म्हणताच भल्या-भल्यांच्या तोंडचे पाणी पळते. मात्र नागपंचमीच्या दिवशी याच सापाचे पूजन केले जाते आणि नंतर मात्र अन्य दिवशी साप दिसताच त्याला ठार केले जाते. शेतकऱ्यांचा खरा मित्र म्हणून ओळख असलेल्या सापाला आजही अज्ञानापोटी जीवदान देण्याचा विचार न करताच, थेट ठार मारण्याच्या तयारीतच माणूस असतो. हेच कारण आहे की, दिवसेंदिवस सापांची संख्या कमी होत चालली असून कित्येक प्रजातींचे साप दुर्मिळ होत आहेत. साप दिसला म्हणजे तो विषारीच, अशी समज सर्वांचीच आहे व हीच बाब सापांसाठी धोक्याची बनली आहे. मात्र प्रत्येक साप विषारी नसून बहुतांश आढळणारे कित्येक साप बिनविषारी असतात. म्हणूनच सामान्य नागरिकांनाही सापांबाबत थोडीफार माहिती असणे गरजेचे आहे. जेणेकरून शेतकऱ्यांच्या खऱ्या मित्राचे जीवन धोक्यात राहणार नाही.
------------------------------
- जिल्ह्यात आढळणारे सापांचे प्रकार...
विषारी- नाग, मण्यार, घोणस, पट्टेरी मण्यार, फुरसे.
बिनविषारी - धामण, कवड्या, अजगर, काळतोंड्या, कुकरी, धोंड्या, गवत्या, गजरा, तस्कर, डुरक्या घोणस, धुळ नागिण, पिवळा कवड्या, वाश्या, हरणतोड.
-------------------------------
साप आढळला तर...
- साप आढळल्यास त्याच्या जवळ जाऊ नका व लगेच सर्पमित्राला बोलवा.
- घरात साप आढळल्यास घरातील सदस्यांना बाहेर काढा व त्याच्यावर लक्ष ठेवा, जेणेकरून तो नजरेआड होऊ नये.
- मोकळ्या जागेत किंवा रस्त्यावर साप दिसल्यास त्याला अगोदर जाऊद्या. त्याची छेड काढू नये किंवा मारू नये.
--------------------------
(बॉक्स)
साप हा तर शेतकऱ्यांचा मित्र
शेतातील पिकांना खराब करण्याचे काम उंदीर व अन्य प्राणी करतात. अशावेळी साप त्यांना खाऊन पीक वाचवितात व एकप्रकारे शेतकऱ्यांची मदतच करतात. म्हणूनच सापाला शेतकऱ्यांचा मित्र म्हटले जाते. तसेच पावसाळ्यात पाल, उंदीर, सरडे, बेडूक व अन्य प्राण्यांची संख्या वाढत असल्याने साप त्यांना खाऊन मानवाची मदतच करतो.
---------------------------
साप स्वत: कधीच कुणावर हल्ला करीत नाही. मात्र त्याची छेड काढल्यास स्वरक्षणासाठी तो दंश करतो. यामुळे सापाला मारू नये. साप हा मानवाचा शत्रू नसून मित्र आहे. साप दिसल्यास त्याला न मारता सर्पमित्राला बोलावून जंगलात सोडा.
- राहुल लाडे (सर्पमित्र)