गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर ते बिलासपूर रेल्वे मार्गावर सर्वाधिक उत्पन्न देणारे रेल्वे स्थानक म्हणून गोंदियाची ओळख आहे. मात्र आवश्यक असणाऱ्या सुविधा या स्थानकावर नसल्याने प्रवाशांची मोठीच तारांबळ होत होती. मात्र जवळपास मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या रेल्वे स्थानकाच्या विकास कार्यांनी गती पकडल्याने प्रवाशांसाठी लिफ्टची सुविधा लवकरच उपलब्ध होण्याचे चिन्ह दिसून येत आहे. अपंग व वृद्धांची हेळसांड होत असल्याने स्वयंचलित पायऱ्या (एस्कलेटर) व लिफ्टची सोय रेल्वे स्थानकात करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यात होमप्लॅटफॉर्मवर शेडचाही समावेश होता. या शेडचे काम पूर्ण झाले व त्यानंतर लिफ्टच्या कामाने गती पकडली. खोदकाम आटोपले असून होमप्लॅटफॉर्म व प्लॅटफॉर्म क्रमांक ३ व ४ वर लिफ्टसाठी मनोरे तयार करण्यात आले. त्यानंतर नवीन पुलाची निर्मिती करून दोन्ही मनोरे जोडण्याचे काम पूर्णत्वास गेल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. लिफ्टसाठी काही तांत्रिक बाबी पूर्ण करावयाच्या असून विद्युत कार्य बाकी आहे. सदर पुलाचे काम पूर्ण होताच लिफ्टचे काम सुरू होईल व त्यानंतर लगेच एस्कलेटरचे काम सुरू होणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी कळविले आहे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश व छत्तीसगडच्या प्रवाशांना गोंदिया रेल्वे स्थानकातूनच इतरत्र ये-जा करावी लागते. दररोज ६० पेक्षा अधिक प्रवाशी गाड्या या स्थानकातून धावतात. दररोज जवळपास २० हजार प्रवाशी येथे उतरतात व एवढेच प्रवाशी गाड्यांमध्ये चढतात. या स्थानकाचे विस्तारीकरण करण्यात आले. तीनऐवजी आता सात फलाटांवरून गाड्या धावतात. प्रवासी संख्या वाढल्याने लिफ्ट व एस्कलेटरची सोय शक्य तेवढ्या लवकर होणे गरजेचे आहे. या सुविधांचा अधिक लाभ वृद्ध व अपंगाना एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर ये-जा करण्यासाठी होणार आहे.(प्रतिनिधी) ‘एमएसटी’धारकांची मागणी अपूर्ण ४महिन्याभराची तिकीट घेवून नियमानुसार विदर्भ एक्सप्रेसच्या आरक्षित बोगीत प्रवास करता येत नाही. मात्र अशा तिकीटधारकांना विदर्भ एक्सप्रेसच्या आरक्षित बोगीत प्रवास करण्याची मुभा असावी, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मंजुरीनंतर एमएसटी धारकांना याचा लाभ मिळेल. सध्या ही सोय नसल्यामुळे दररोज शेकडो पासधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक दिवसांपासूनची ही मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही. स्थानकावर केलेल्या सोयी ४होम प्लॅटफॉर्मवर अतिरीक्त १३५ खुर्च्या व अतिरीक्त ४५ बेंचची व्यवस्था रेल्वेने केली. फलाट क्रमांक ५ व ६ वर अतिरीक्त १४ बेंच लावण्यात आले. प्रवाशांची गर्दी बघता स्थानकाच्या दोन्ही बाजूला एकेक खिडकीवर आरक्षित व अनारक्षित दोन्ही प्रकारच्या तिकिटा मिळण्याची व्यवस्था करण्यात आली. टी.सी. कार्यालयात बॉयोमेट्रीक अटेंडन्स व्यवस्था करण्यात आली. शिवाय पार्सल त्वरित पोहोचण्यासाठी पार्सल मॅनेजमेंट सिस्टिममध्ये सुधारणा सुरू आहे. नव्याने एक क्वॉईन आॅपरेटेड तिकीट व्हेंडिंग मशीन उपलब्ध झाली आहे. मात्र ती संचालित करण्यात आली नाही.
प्रवाशांसाठी लिफ्ट सुविधा लवकरच
By admin | Published: February 01, 2017 12:36 AM