४.१२ कोटींचे काम : होम प्लॅटफार्मवर शेड बांधकामाला गतीगोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर ते बिलासपूर रेल्वे मार्गावर सर्वाधिक उत्पन्न देणारे रेल्वे स्थानक म्हणून गोंदिया स्थानकाची ओळख आहे. मात्र आवश्यक असणाऱ्या सुविधा या स्थानकावर नसल्याने प्रवाशांची तारांबळ अजूनही सुरूच आहे. दोन वर्षांपूर्वी बिलासपूर रेल्वे झोनचे तत्कालिन महाव्यवस्थापक अरूणेंद्रकुमार यांनी स्वयंचलित पायऱ्या (एस्कलेटर) व लिफ्टची सोय येथे करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्यानुसार लिफ्टचे काम सुरू झाले असले तरी एस्कलेटरचे काम अद्याप थंडबस्त्यात आहे. त्यामुळे या वर्षात गोंदिया स्थानकावर अपंग आणि वृद्धांचा त्रास दूर होण्याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.गोंदिया रेल्वे स्थानकाला ज्या सुविधांची गरज होती व अनेक वर्षांपासून ज्या अत्याधुनिक यंत्रांची मागणी होती, त्यात एस्कलेटर, लिफ्टचा प्रामुख्याने समावेश होता. येथील होम प्लॅटफार्मवर लिफ्ट, एस्कलेटर व शेड बांधकामाचा शुभारंभ जून २०१५ मध्ये खा.नाना पटोले यांच्या हस्ते, नागपूर रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक आलोक कंसल यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. मात्र आता वर्ष २०१६ सुरू झाले असतानाही एस्कलेटरच्या कामाचा काहीच पत्ता नाही. त्यामुळे वृद्ध व अपंगांची मोठीच हेळसांड होत आहे. लिफ्टचे काम सुरू असून ते कधी पूर्णत्वास जाईल, याबाबतही रेल्वेचे अधिकारी ठामपणे काहीही सांगत नाहीत.एस्कलेटर (स्वयंचलित पायऱ्या) व लिफ्टच्या कामाचे जून २०१५ मध्ये भूमिपूजन करण्यात आले त्यावेळी विभागीय महाव्यवस्थापक कंसल यांनी शेड बांधकामासाठी १.९९५ कोटी रूपयांचा खर्च तर एस्कलेटरसाठी १.३४ कोटी रूपयांचा खर्च येणार असल्याचे सांगितले होते, प्लॅटफार्म- १ व २ वर हे शेड लावण्यात येणार आहे. तर लिफ्ट प्लॅटफार्म-१ वर लागणार असून त्यासाठी ९७ लाख रूपयांचा खर्च येणार आहे. लिफ्ट व एस्कलेटरमुळे अपंग व वृद्धांना एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर ये-जा करण्याची सुविधा होणार आहे. लिफ्टसाठी खोदकाम सुरू आहे. मात्र एस्कलेटरच्या कामाबाबत कुणीही बोलत नाही. येथे वृद्ध व अपंगांना एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर ये-जा करण्यासाठी स्वयंचलित पायऱ्यांची तातडीने गरज आहे. त्यासाठी स्थानकाचे निरीक्षण व निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या, मात्र प्रत्यक्षात कामाला विलंब होत आहे. त्यामुळे घोडे कुठे अडले हे कळायला मार्ग नाही. (प्रतिनिधी)
लिफ्टचे काम सुरू, एस्कलेटर थंडबस्त्यात !
By admin | Published: January 08, 2016 2:20 AM