कंडक्टर तुटल्याने त्रास : वादळ-वाऱ्याने वाढली डोकेदुखीगोंदिया : जिल्हा भारनियमनमुक्त असला तरीही वेळी-अवेळी होत असलेल्या विजेच्या लपंडावाने जिल्हावासी चांगलेच त्रस्त झाले आहेत. यामागे वाहिन्या व कंडक्टरमध्ये येत असलेला बिघाड कारणीभूत ठरत आहे. शिवाय वादळवाऱ्याने महावितरणला हैरान करून सोडल्याचेही दिसून येत आहे. यात मात्र सामान्य नागरिक चांगलाच होरपळून निघत आहे. भारनियमनाच्या जाचापासून जिल्ह्याची सुटका झाली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना असलेला धसका आता नाहीसा झाला आहे. मात्र विजेचा लपंडाव कमी झालेला नाही. त्यात उन्हाळ््याच्या दोन महिन्यांत उन्हाने चांगलेच शेकून काढले असतानाच महावितरणचेही वादळीवाऱ्याने चांगलेच नुकसान केले. पाऊस तर पाहिजे तसा बरसला नाही. त्यामुळे उकाडा अद्याप जिल्हावासीयांना शेकून काढत आहे. अशात एका मिनीटालाही वीज पुरवठा खंडीत झाल्यास अंगावरून घामाच्या धारा वाहू लागत आहेत. मागील काही दिवसांपासून शहरात वेळी अवेळी वीजेचा लपंडाव सुरू आहे. या प्रकारामुळे शहरवासीयांची झोप उडाली असून महावितरणप्रती रोष व्याप्त आहे. दिवसा तर दिवसा मात्र रात्रीलाही वीज पुरवठा खंडीत होत असल्याचे प्रकार मागील काही दिवसांत घडले आहेत. यामागचे कारण जाणून घेतले असता कळले की, इनसुलेटर शॉट झाल्यामुळे दुरूस्तीसाठी वीज पुरवठा खंडीत करावा लागत आहे. २८ जून रोजी रावणवाडी परिसरात कंडक्टर तुटून वाहिनीवर पडल्याने वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्याची दुरूस्ती करण्यासाठी वीज पुरवठा बंद करून दुरूस्ती करावी लागली. शिवाय वादळीवारा महावितरणसाठी त्रासदायक ठरत आहे. ऐनवेळी येत असलेल्या बिघाडामुळेही महावितरणला दुरूस्तीसाठी वीज पुरवठा खंडीत करावा लागत आहे. (शहर प्रतिनिधी)
बिघांडामुळे होतेय विजेचा लपंडाव
By admin | Published: July 01, 2016 1:42 AM