अर्जुनी-मोरगाव : राज्यात कोरोनाचे सावट असले तरी महाशिवरात्री पर्वावर प्रतापगड येथे गुरुवारी (दि.११) हजारों श्रद्धाळूंनी हजेरी लावली. शिवमंदिरात भोले शंकराचे तर दर्ग्यावर हजरत ख्वाजा उस्मान गणी हारुनी बाबांचे दर्शन घेऊन भाविक धन्य झाले. कोरोना संक्रमणाच्या भीतीपोटी प्रतापगड ग्रामपंचायतच्यावतीने लॉकडाऊन जाहीर केला असल्याने यावर्षी यात्रा भरली नाही.
महाशिवरात्री पर्वावर प्रतापगड येथे अनादि काळापासून मोठी जत्रा भरते. प्रतापगड हे ठिकाण हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारा भोळाशंकर अशी ख्याती आहे. त्यामुळे विदर्भासह नजीकच्या राज्यातून दरवर्षी लाखों भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात. यावर्षी मात्र जत्रेवर कोरोनाचे सावट आहे. कोरोनाचे संक्रमण होऊ नये याची खबरदारी म्हणून प्रतापगड ग्रामपंचायतने यात्रा काळासाठी लॉकडाऊन घोषित केले. गावातील सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली. यात्रेत व्यावसायिक प्रतिष्ठानांवर बंदी घालण्यात आली. त्यामुळे यात्रास्थळी पूजेच्या साहित्यांसह इतर वस्तूंची दुकाने लागलीच नाहीत. दरवर्षीप्रमाणे पोलिसांनी चोख बंदोबस्त पाळत चिचोली, सुकळी, कढोली गोठणगाव या मार्गाने येणारी वाहने गावाबाहेरच थांबविली. श्रद्धाळू भाविकांनी अगदी शांततेत दर्शन घेतले. अनेक भाविक मास्क न लावताच दर्शनासाठी जाताना दिसून आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी पहाडावर चढून भोले शंकराच्या मंदिरात अभिषेक केला. त्यानंतर त्यांनी बाबा हजरत ख्वाजा उस्मान गणी हारुनी यांच्या दर्ग्यावर जाऊन चादर चढविली. भोले शंकराच्या दर्शनस्थळी चोख बंदोबस्त होता. दरवर्षी नाना पटोले मित्र परिवार व स्व. मनोहरभाई पटेल अकादमीच्यावतीने महाप्रसाद वितरण व्हायचे. मात्र भाविकांची गर्दी टाळण्यासाठी ते यावर्षी झाले नाही. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने भाविकांच्या जाण्या-येण्यासाठी बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
----------------
कोरोनाचे संकट टळू दे- पटोले
कोरोनाच्या संकटात एक वर्ष गेला. यादरम्यान जनतेला अनेक संकटांना सामोरे जावे लागले. राज्याची आर्थिक घडी विस्कटली. लोकांनी कोरोनाला धैर्याने तोंड दिले. जम बसत असताना कोरोनाने परत डोके वर काढले. कोरोनाचे संकट टळू दे. शेतकऱ्यांत सुखसमृद्धी नवचैतन्य नांदू दे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. पटोले यांनी गुरुवारी प्रतापगडच्या शिवशंकराला साकडे घातले.
-----------------
प्रतापगड बंधूभावाचे प्रतिक- चंद्रिकापुरे
मांगल्य जपणारा, आनंद देणारा व बंधुभाव वाढविणाऱ्या या महाशिवरात्री पर्वाला प्रतापगड येथे अत्यंत महत्व आहे. यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे भाविकांचा हिरमोड झाला. दरवर्षीप्रमाणे भाविक भोळेशंकर व हजरत ख्वाजा उस्मान गणी हारुनी बाबांचे दर्शन घेऊ शकले नाही. तरीसुद्धा हजारों श्रद्धाळुंनी दर्शन घेतले. कोरोनाला आपण सर्व मिळून हरवायचे आहे. प्रशासनाला सहकार्य करा. भोळेशंकर कोरोनाचे संकट दूर करो, यावर्षी वरुणराजा संतुलित बरसून बळीराजाला सुखी करो अशी आपण प्रार्थना केल्याचे आ. चंद्रिकापुरे यांनी सांगितले.