गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनऐवजी कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याच अंतर्गत जिल्हा अधिकारी दीपककुमार मीना यांनी बियर बार, देशी दारूची दुकाने आणि वाईन शॉप्सच्या वेळेत बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ही सर्व दुकाने आता रात्री ८ वाजता डाऊन होणार आहे. हा नवीन नियम बुधवारपासून (दि.१७) लागू होणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या नवीन आदेशानुसार जिल्ह्यातील बीयर बार सकाळी ११.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत, तर देशी दारू दुकाने सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत आणि वाईन शॉप सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंतच सुरू ठेवता येणार आहेत. यासंबंधीच्या सूचना जिल्ह्यातील सर्व मद्य विक्रेते, बियर बार संचालक यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिल्या आहेत. जिल्ह्यात मागील तीन=चार दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. तर वाईन शॉप, बियर बार, देशी दारू दुकाने या ठिकाणी ग्राहकांची गर्दी होत असल्याने कोरोना संसर्ग वाढण्यास ते कारणीभूत ठरू शकते. त्यामुळेच कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना नियम व आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये हे नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
.........
बाजारपेठ रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यावर मंथन
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी शहरातील सर्व दुकाने, बाजारपेठ सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असल्याची माहिती आहे. मंगळवारी यासंदर्भात जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांनी सर्वच विभागाच्या प्रमुखांची बैठक घेऊन या विषयावर मंथन केले. येत्या दोन दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे.
........
हॉटेल्स, लॉन्स संचालकांची घेतली बैठक
शासनाने नवीन निर्बंध लागू केले आहेत. यानुसार लग्न सोहळ्याला ५० जणांना उपस्थितीत राहण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जावे यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज देशपांडे यांनी मंगळवारी शहरातील हॉटेल्स आणि लॉन्स संचालकांची बैठक घेऊन त्यांना या नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या.