संतोष बुकावन ।ऑनलाईन लोकमतसंत चोखोबानगरी (अर्जुनी मोरगाव) : संत ही अध्यात्मक्षेत्रातील अत्यंत उच्च कोटीची अवस्था आहे. सर्व भूताहितरत ज्ञानी, प्रेमळ भक्त हा संत शब्दाचा अर्थ आहे. संत कोणत्या ना कोणत्या धर्मसंप्रदायाचे अनुगृहित होते. त्यांच्या धर्मसाधनेचा एक भाग म्हणून त्यांनी साहित्यनिर्मिती केली. या संत पुरुषाचे विविध गद्य-पद्य प्रकारातून अविष्कृत होणारे परमार्थप्रवण साहित्य म्हणजे संत साहित्य होय, असे उद्गार ७ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ह.भ.प. डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी काढले.वारकरी साहित्य परिषद व डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक जि.प.कनिष्ठ महाविद्यालय संत चोखोबानगरी येथे आयोजित मराठी संत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.या वेळी मंचावर ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, पुंडलिक फडाचे प्रमुख ह.भ.प. माधव महाराज शिवणकर, ह.भ.प. त्र्यंबकदादा गायकवाड, मंगळवेढेकर, संत कबीर मठाचे प्रमुख ह.भ.प. कबीरबुवा, ह.भ.प. नरहरीबुवा चौधरी, संत एकनाथ महाराजांचे वंशज ह.भ.प. प्रविण गोसावी, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, आयबीएन लोकमतचे राजेंद्र हुंजे, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष हभप विठ्ठल पाटील उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात राष्टÑसंत तुकडोजी महाराजांच्या ‘या भारतात बंधूभाव नित्य वसू दे’ या भजनाने झाली. पंढरपुरचे वारकरी संप्रदायाचे फडकरी सभास्थळी टाळ मृदंगाच्या वाद्यात त्यांचे आगमन होताच त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. याचवेळी अध्यात्माच्या रंगात संपूर्ण अर्जुनी-मोरगाव नगरी न्हावून निघाली. ग्रंथपूजन, दीपप्रज्वलन व विणा पूजनाने ७ व्या अ.भा. मराठी संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. लहवितकर महाराज म्हणाले, महाराष्टÑ ही संताची भूमि आहे. राष्ट्र योगदानात संताची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. संताचा परतत्वाचा ध्यास, भूतमात्रांच्या हिताशी असणारी बांधिलकी आणि स्वानुभावांना दिलेले महत्व, नैतिकतेचा आग्रह आणि जीवन सन्मुख वृत्ती या सर्व गोष्टी संत साहित्यात देहीभूत झालेल्या आहेत. प्राप्त युगात ज्या युगाला आपण कलियुग म्हणून संबोधतो अशा युगात भक्ती हा एकमेव सर्वांना सुलभ असा अध्यात्म साधना मार्ग होय. पूवर्ई सत्यनिष्ठा व निष्काम कर्मपरता या गोष्टी आचरणात होत्या.प्राप्त युगात या मुल्यांच्या थेट उलटच वर्तन घडताना दिसून येत आहे. विठ्ठल पाटील म्हणाले भारत ही संताची, शुरांची, विरांची भूमी आहे. त्या भूमितील संतांनी दिलेले विचार हे संपूर्ण विश्वातील मानवाच्या कल्याणासाठी आहेत. नितीमूल्ये व जीवनमूल्ये सर्वांनी जोपासली तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही. तत्व व निती मूल्यांशिवाय देश सुरक्षित नाही. संतांचे विचार जुनाट नाही तर ते वर्तमान पिढीत पेरण्यासारखे आहेत. मनुष्यात सुखशांती नांदविण्याचे प्रतिक आहेत. विष हे विष नसते तर अतिविष असते हे समाजाला सांगण्याची गरज आहे. जिथे विज्ञान थांबतो तिथे अध्यात्माची सुरुवात होते. ही मानवतावादी विचार सांगणारी परिषद आहे. त्यांनी वर्तमान पिढीला लागलेले मोबाईल ज्वर व व्यसनाधिनतेवरही प्रहार केला. या कार्यक्रमातून हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी हभप डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांचेकडे संमेलनाध्यक्षपदाचे सूत्रे सोपविली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल पाटील यांनी केले. संचालन डॉ. दिलीप काकडे यांनी केले. पसायदानाने उद्घाटनीय कार्यक्रमाची सांगता झाली.
गद्य-पद्यातून अविष्कृत होणारे परमार्थप्रवण म्हणजे साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 11:32 PM
संत ही अध्यात्मक्षेत्रातील अत्यंत उच्च कोटीची अवस्था आहे. सर्व भूताहितरत ज्ञानी, प्रेमळ भक्त हा संत शब्दाचा अर्थ आहे. संत कोणत्या ना कोणत्या धर्मसंप्रदायाचे अनुगृहित होते.
ठळक मुद्देसातव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन