आरोप ग्रामस्थांचा : नागरिकांची कामे खोळंबतातगोंदिया : अनेक शासकीय कर्मचारी आपल्या अधिवास असलेल्या गावातून आपल्या कर्तव्यस्थळी अप-डाऊन करतात. त्यामुळे वेळेवर नागरिकांची कामे पूर्ण होत नाही, कामे रखडतात. तरीसुद्धा हे कर्मचारी घरभाडे भत्ता व अतिरिक्त घरभाडे भत्त्याची (अनुज्ञप्ती शुल्क) उचल करतात. अशा कर्मचाऱ्यांवर शासन-प्रशासनाने कारवाई करावी व त्यांच्याकडून घरभाडे व अनुज्ञप्ती शुल्क वसूल करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. प्राप्त माहितीनुसार, रावणवाडी मंडळांतर्गत येणाऱ्या तलाठी हलका क्रमांक-२२ (सावरी) येथील तलाठी ए.एल. बिसेन हे सावरी येथे नियुक्त झाल्यापासून मुख्यालयी राहत नाही. तसेच मुख्यालयात मुक्कामी न राहता व वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी न घेता मुख्यालयाबाहेर तिरोडा येथून ये-जा करतात. त्यामुळे त्यांना घरभाडे दिले जावू शकत नाही, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.सदर तलाठी कधी उशीरा येतात तर कधी लवकर निघून जातात. तर कधी-कधी कार्यालयात येत नाही. ग्रामस्थांबरोबर त्यांची वागणूक सौंहार्द्रपूर्ण नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र त्यांना नियुक्तीच्या दिनांकापासून घरभाडे भत्ता व अतिरिक्त घरभाडे भत्ता म्हणजे अनुज्ञप्ती शुल्क पगारासोबत दिले जात आहे. परंतु आजपर्यंत सदर तलाठी सावरी येथील हलक्यामध्ये वास्तव्यास राहिलेले नाही. त्यामुळे त्यांना शासनाकडून वेळोवेळी मिळालेले घरभाडे व अतिरिक्त घरभाडे अनुज्ञेय नाही, अशी ग्रामस्थांची धारणा आहे. सदर प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन चौकशी करावी. तसेच सदर तलाठ्याला पगारासोबत देण्यात येणारा घरभाडा व अतिरिक्त घरभाडा तात्काळ थांबवावे व यापूर्वी वेतनासह दिलेला घरभाडा वसूल करून सरकार जमा करावे, अशी तक्रार राहुल कटरे, रवी सोनवाने व इतर ग्रामस्थांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी गोंदिया यांना देवून कारवाईची मागणी केली आहे.
अप-डाऊन करूनही घरभाडे भत्त्याची उचल
By admin | Published: January 11, 2016 1:41 AM