अंकुश गुंडावार
गोंदिया : स्थानिक कारागीर, बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू व शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली फळे आणि वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, स्वदेशी वस्तूंना चालना देऊन रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी रेल्वे बोर्डाने ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ ही योजना सुरू केली आहे. रेल्वेस्थानकावर या वस्तू विकण्यासाठी प्रत्येक गटाला १५ दिवसांसाठी स्टाॅल उपलब्ध करून दिले जात आहेत. यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण हाेण्यास मदत होत आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सन २०२२-२३ चा अर्थसंकल्प सादर करताना ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ या योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर रेल्वे बोर्डाने या योजनेची अंमलबजावणी करण्यास प्रारंभ केला आहे. योजनेच्या माध्यमातून स्थानिक वस्तूंना बाजारपेठ आणि ग्राहक मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या योजनेमुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे. गोंदिया रेल्वे स्थानकावर बांबूपासून निर्मित विविध वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले आहेत. बांबूपासून विविध कलाकुसरीच्या वस्तू स्थानिक काष्ठशिल्पकार तयार करतात. रेल्वे स्थानकावर विविध राज्यांतील प्रवाशांची ये-जा असते. रेल्वे स्थानकावर या वस्तू विक्रीस उपलब्ध असल्यास त्यांना चांगली मागणी मिळू शकते. या माध्यमातून स्थानिकांना रोजगारदेखील मिळण्यास मदत होऊ शकते. याच दृष्टिकोनातूृन हा उपक्रम सुरू केला आहे.
सर्वांना मिळणार संधी
बचत गट, काष्ठशिल्पकार आणि इतर स्थानिक कारागिरांना त्यांनी निर्मित केलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी १५ दिवसांच्या कालावधीचे स्टॉल लावण्याची परवानगी रेल्वे बोर्डाने दिली आहे. यासाठी स्थानिक रेल्वे स्टेशन व्यवस्थापकाकडे अर्ज करावा लागणार आहे. प्राप्त अर्जानुसार प्रत्येकाला संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
शेतकऱ्यांना होणार मदत
गोंदिया जिल्हा हा धान उत्पादकांचा जिल्हा असून जय श्रीराम, चेन्नूर, एचएमटी, बासमती यासारख्या चांगल्या प्रतीचा तांदूळ बाहेर विक्रीसाठी पाठविला जातो. त्यामुळे या तांदळाचे ब्रॅन्डिंग करण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे. केवळ तांदूळच नव्हे, तर विविध फळे आणि स्थानिक उत्पादनांची विक्रीसुद्धा रेल्वे स्थानकावर करता येणार आहे.
‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ उपक्रमांतर्गत स्थानिक वस्तूंना बाजारपेठ आणि रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्याचा हेतू आहे.
- जनसंपर्क अधिकारी.