नवेगावबांध : स्थानिक ग्रामीण रुग्णालयात एकूण २७ पदांपैकी ११ पदे रिक्त आहेत. यासाठी अनेक वेळा मागणी करूनही फरक पडत नसल्यामुळे स्थानिक नागरिकांनी बुधवारी (दि.२५) या रुग्णालयाला कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.यापूर्वी अशाच पद्धतीने नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. त्यावर आरोग्य उपसंचालकांचे प्रतिनिधी डॉ. विनोद वाघमारे यांनी ९ मे रोजी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून मागण्या मंजूर करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र सुमारे दोन आठवड्यांचा कालावधी लोटला तरी आश्वासनांची पुर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे बुधवारी ग्रामीण रुग्णालयात तालाठोको आंदोलन करण्याचे आंदोलकांनी ठरविले आहे. गोंदिया जिल्ह्यातील एक प्रतिष्ठित रुग्णालय म्हणून नवेगावबांधच्या ग्रामीण रुग्णालयाची ख्याती होती. परंतु प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे रुग्णालयाची प्रतिष्ठा खालावत चालली आहे. मान्य २७ पदांपैकी ११ पदे सध्या रिक्त आहेत. त्यामध्ये डॉक्टर ३, परिचारिका २, नेत्र तंत्रज्ञ १, क्ष-किरण तंत्रज्ञ १, सफाई कामगार १, चतुर्थ श्रेणी कर्मचारी ३ ही पदे रिक्त आहेत. मागील दोन महिन्यांपासून चार डॉक्टर्सचे काम एकाच डॉक्टरच्या खांद्यावर आले आहे. रुग्णांवर उपचार व कार्यालयीन कामाचा ताण वाढत असल्याने त्यांची मानसिकता ढासळत आहे. रिक्त पदांच्या कामाचा अतिरीक्त ताण कार्यरत कर्मचाऱ्यांवर पडत आहे. याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम रुग्णांच्या सेवांवर होत आहे. नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यास शासन कटिबध्द आहे. परंतु प्रशासकीय अनास्थेपोटी शासकीय धोरणाला हरताळ फासला जात आहे. यामध्ये मात्र गरीब जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दवाखान्याचेच आरोग्य बिघडलेले असताना रुग्णांवर उपचाराची अपेक्षा कशी करावी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (वार्ताहर)अनास्थेमुळे आंदोलनाची वेळनवेगावबांधचे ग्रामीण रुग्णालय आपल्या सेवेसाठी जिल्ह्यात परिचीत होते. परिसरातील सामान्य व गरीब जनतेच्या आशेचा किरण होते. परंतु लोकप्रतिनिधींची अनास्था, प्रशासकीय अधिकाऱ्यांची कामचलाऊ प्रवृत्ती तसेच स्थानिक कर्मचाऱ्यांचा अंतर्गत विरोध व हेवेदावे यामुळे सदर रुग्णालयाच बिमार झाल्यासारखे वाटत आहे. सदर रुग्णालयाची रुग्णसेवा पूर्वीसारखीच सुरळीत व्हावी व पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त व्हावी यासाठी नागरिक आंदोलनाचा पवित्रा घेत आहे, असे विजय डोये, नवलकिशोर चांडक, विलास कापगते, दिनेश खोब्रागडे, रितेश जायसवाल, रामदास बोरकर, जितेंद्र कापगते, होमराज पुस्तोडे, योगराज पुस्तोडे, नामदेव कापगते, धनराज डोंगरवार, प्रविण गजापुरे, चंद्रभान टेंभुर्णे, संजय खरवडे, होमराज काशिवार, पितांबर काशिवार यांनी संयुक्त स्वाक्षरीनिशी प्रशासनाला कळविले आहे. प्रशासन आता कोणती कार्यवाही करते याकडे परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.
ग्रामीण रुग्णालयाच्या प्रतिष्ठेसाठी आज ‘ताला ठोको’ आंदोलन
By admin | Published: May 25, 2016 2:00 AM