विद्यार्थ्यांचा रस्ता रोको : शिक्षकांच्या व्यवस्थेनंतर उघडले कुलूप लोकमत न्यूज नेटवर्क परसवाडा : येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात दोन वर्षांपासून शिक्षकांची कमतरता असून त्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे कित्येकदा निवेदन देऊन मागणी केली. मात्र शिक्षण विभागाकडून काहीच पाऊल उचलले जात नसल्याने मंगळवारी (दि.११) विद्यार्थी, पालक व शाळा समितीने शाळेला कुलूप ठोकले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी रस्ता रोको केले. दरम्यान चार शिक्षकांची तात्पुरती व्यवस्था केल्यानंतर व लवकरच स्थायी शिक्षक देण्याच्या आश्वासनानंतर कुलूप उघडण्यात आले. शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हा गंभीर विषय असल्याने शाळा समितीने कित्येकदा शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांची भेट घेतली. त्यांना ठराव देऊन निवेदन दिले, मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. यावर शाळा समितीने शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार, मंगळवारी (दि.११) विद्यार्थी, पालक व शाळा समितीने शाळेच्या गेटला कूलप ठोकले. शाळा समिती व पालकांनी जोपर्यंत स्थायी शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत शाळेला कुलूप राहणार अशी टोकाची भूमीका घेतली. तर विद्यार्थ्यांनी तिरोडा-धापेवाडा-गोंदिया मार्गावर रस्ता रोकोेकेले. नागरिकांचा वाढता रोष बघता शिक्षण विभागाने त्वरीत चार शिक्षकांचे तात्पुरते आदेश काढले. ते आदेश घेऊन गट शिक्षणाधिकारी सुनील मांढरे यांनी शाळा समिती अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, पालक व प्राचार्यांना दिले. पण शाळा समिती शिक्षकांची स्थायी नियुक्ती होत नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवण्यावर अडून होती. यावर गटशिक्षणाधिकारी मांढरे, पोलीस निरीक्षक वामन हेमणे, प्राचार्य डॉ. प्रभाकर लोंडे, सरपंच सुलक्ष्मी शामकुवर, उपसरपंच मनीराम हिंगे, शाळा व्यपस्थापन समिती अध्यक्ष धर्मेंद्र टेकाम, बाळू सोनेवाने, तुकाराम गोंदुळे व पालकांची बैठक घेतली. यात मांढरे यानी १५ दिवसांत शिक्षणाधिकाऱ्यांना पूर्ण माहिती देणार व शिक्षकांची व्यवस्था करवून देणार असे लिहून दिले व तेव्हा पालक समितीने कुलूप उघडले. दरम्यान, सभापती पी.जी.कटरे यांच्याशी संपर्क केला असता १७ तारखेला आयुक्तांकडे पदोन्नती शिक्षकांची सभा असून त्यात निर्णय होताच शिक्षक त्वरीत भरण्याचे आश्वासन दिले. चार शिक्षकांची तात्पुरती व्यवस्था शिक्षकांसाठी सुरू असलेल्या गोंधळाला बघता शिक्षण विभागाने चार शिक्षकांची तात्पुरती व्यवस्था केली. यात वर्ग ५ ते १० साठी ए.व्ही.मेश्राम, आर.टी.वानखेडे, के.पी.वरठी, व्ही.पी.भालाधरे यांचे आदेश काढण्यात आले.
शिक्षकांसाठी शाळेला ठोकले कुलूप
By admin | Published: July 12, 2017 2:25 AM