दवनीवाडा येथील प्रकरण : जि.प.अध्यक्षांना निवेदन परसवाडा : दवनीवाडा येथील ब्रिटीश कालीन जून्या शाळेला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. रिक्त असलेली ही पदे येत्या ६ जुलै पर्यंत न भरल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा गावकऱ्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांना निवेदनातून दिला आहे. या शाळेत वर्ग ५ ते १२ पर्यंत विज्ञान व कला शाखेचे विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. मात्र वर्ग ५ ते ८ मध्ये चार शिक्षकांची कमतरता आहे. वर्ग ११ ते १२ कला शाखेत २ मराठी, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञानशाखा ३, कनिष्ठ सहायक १ असे एकूण नऊ कर्मचारी कमी आहेत. या शाळेतील रिक्त पदे भरण्यात यावी यासाठी माजी उपसरपंच गुड्डू लिल्हारे, सरपंच मस्करे, तत्कालीन पंचायत समिती सदस्य हितेंद्र लिल्हारे, राजेश उरकुडे, लांजेवार, माहुरे, लक्ष्मण मिश्रा व पालकांनी निवेदन दिले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मागील पाच वर्षांपासून फक्त आश्वासन देत असल्याचा सूर निवेदन देणाऱ्यांचा होता. एकीकडे शासन व जिल्हा परिषदेचे अधिकारी व पदाधिकारी शैक्षणिक कार्यक्रमाचा उदो उदो करतात. शासन शिक्षण विभागावर कोट्यवधी रुपयांची उधळण करते. असे असताना ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ खेळला जात आहे. यासाठी येत्या ६ जुलै पर्यंत रिक्त पदे न भरल्यास कुलूप ठोकण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. (वार्ताहर)
शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा
By admin | Published: July 03, 2016 1:52 AM