गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सगळ्यांनाच बुचकळ्यात पाडले. मजुरांना रोजगाराची भीती तर उद्योजक, व्यावसायिकांना कोरोनाची लाट गेल्यानंतर मजूर न मिळण्याची भीती सतावत आहे. कोरोनाचे संकट उभे असताना पोटापाण्याचा प्रश्न व नंतर रोजगार बुडण्याची चिंता सतावू लागली आहे.
गोंदिया जिल्हा छोटा असला तरी या छोट्या जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रात १,८०० कामगार, हॉटेल व्यवसायात १,४०७ तर बांधकाम क्षेत्रात ९४ हजार ५६ कामगारांची नाेंदणी सहायक आयुक्त कामगार कार्यालयात आहे. ग्रामीण भागातील कामगार वर्ग हा मजुरीसाठी शहरात येतो. परंतु कोरोनाच्या संकटाने मागच्या वर्षीसारखा यंदाही कहर माजविल्याने दुसऱ्या लाटेची धास्ती होऊन मागच्या वर्षीच्या संकटाला पेलवून कसेबसे शहरात आलेले कामगार गावी परतले आहेत. याचा धसका उद्योजकांनाही बसला आहे. कोरोनामुळे प्रत्येकावर संकट आले. कामगार आपल्या जीवाच्या भीतीने गावाकडे गेला आहे. त्यांना जेवण देण्यासाठी शासनाने मदत देण्याची योजना सुरू केली. परंतु ही मदत मोठ्या कुटुंबासाठी तोकडीच असल्याचे मजुरांचे म्हणणे आहे. बांधकाम करणाऱ्या कामगारांना प्रत्येकी १५०० रुपयांची मदत मिळणार आहे. राज्य शासनाने जमावबंदीचे आदेश काढले असताना तळहातावर कमवून खाणाऱ्या लोकांच्या भोजनाची सोय म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रासाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज कोरोनाच्या संकटासाठी राज्याला दिले आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी मोलमजुरी करणाऱ्यांना, कामगारांना राज्य शासनाची मदत दिली जाणार आहे. परंतु दुसऱ्या लाटेनंतर रोजगार संपण्याचीच चिन्हे दिसत आहेत.
.......
हाताला काम नाही, इथे तरी काय करणार
१) मागच्या वर्षीही आम्हाला आमच्या गावाला पायी जावे लागले. यंदा पुन्हा तीच परिस्थिती आली तर आम्ही काय? करणार? यासाठी हाताला काम नाही, कुणाची मदत नाही मग येथे करणार? काय? आपल्या गावाला गेलो तर कुटुंबासोबत अर्धे पोट जेवण तरी मिळेल.
रामेश्वर गोस्वामी, कामगार
.....
२) कोरोनाचे संकट म्हटले की भयावह स्थिती असते. मागच्या वर्षीचा थरार आम्ही आमच्या डोळ्याने पाहिला. यंदाही ही स्थिती येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी आधीच गावाचा रस्ता धरणे गरजेचे समजून आम्ही गावाला आलो आहे.
शुभम भांडारकर, कामगार
........
३) लॉकडाऊनमध्ये काम बंद असते, मजुरीही मिळत नाही. अनोळखी शहरात राहून काय? करणार? इकडे कुणीच कुणाचे ऐकेना, परंतु आम्ही आपल्या गावाला पोहचलो तर आमच्या घरचे आमची काळजी तरी करणार? किती दिवस काम बंद राहते हेही सांगता येत नाही.
- छायाबाई कोसरे, कामगार महिला.
..........
कामगार गावी परतला तर...
१) कोरोनाचे संकट एकीकडे तर दुसरे संकट मजूर न मिळण्याचे उभे राहणार आहे. वारंवार लॉकडाऊनमुळे मजूर त्रस्त होऊन गावाकडे चालला असल्याने गावातच आपले छोटे मोठे काम करण्याची इच्छा मजुरांमध्ये दिसून येत आहे. आधीच्याच संकटात सापडलेल्या उद्योगांना मजुरांचे संकट झेलावे लागेल.
बालाराम खंडेलवाल, उद्योजक
....
२) मजुरांचे संकट आधीच होते त्यातच आता पुन्हा कोरोनाची लाट आल्याने मजूर आपल्या गावाला परतले आहेत. आता पुन्हा काम सुरळीत झाल्यावर ते पुन्हा कामावर येणार की नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे मजूरवर्गामुळे आमच्या उद्योगधंद्यावर खूप मोठी समस्या येणार आहे.
- हरगोविंददास असाटी, उद्योजक
......
३) मजुराच्या संकटातून एकदा मागच्या वर्षी कसाबसा सावरत असताना यंदा पुन्हा कोरोनाच्या संसर्गामुळे उद्योगधंदे बंद झाले. कामगार आता येथे न थांबता आपल्या गावाला परतला आहे. पुन्हा कामावर येणार की नाही सांगता येत नाही. आमच्या पुढे अनेक संकटे आहेत. काय होते हे वेळच ठरवेल.
- रितेश अग्रवाल, उद्योजक
...............
गेल्या वर्षीच्या आठवणी : मागच्या वर्षी एप्रिल महिन्याचा उन्हाळा सहन करीत दळणवळणाची साधने नसताना पायी पायी चालत ५०० ते १००० किलोमीटर आम्ही आपल्या गावाला गेलो. मागच्या वर्षी आम्ही थरार पाहिला आहे. ना जीवाची भीती, ना पाेटाची आग दिसली, ध्यास होता फक्त घरी पोहचण्याचा.
........
औद्योगिक कामगार-१८००
हॉटेल कामगार-१४०७
बांधकाम कामगार- ९४०५६
......