लोकमत न्यूज नेटवर्क गोरेगाव : तालुक्यातील कुऱ्हाडी येथील केंद्रीय जि.प. माध्यमिक शाळेत गेल्या एक वर्षापासून गणित व विज्ञान शिक्षक कमी होते. नव्या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना शिक्षक द्या अन्यथा शाळा बंद करा, असा कडक इशारा देऊन पालक व पदाधिकाऱ्यांनी शाळेला पहिल्याच दिवशी कुलूप ठोकले होते. मात्र बीईओ यांच्या आश्वासनानंतर कुलूप उघडण्यात आले. सर्व शिक्षक व मुख्याध्यापक शाळा उघडून कार्यक्रमाच्या तयारीत असतानाच पालकांसह विद्यार्थीही शाळेत पोहोचले. गावाच्या पदाधिकाऱ्यांनी मागील वर्षापासून गणित व विज्ञान विषयाच्या शिक्षकांच्या कमतरतेचा विषय घेऊन दोन विषयांच्या शिक्षकांची कमी पाहता शाळेला कुलूप ठोकले होते. यावेळी सरपंच संजय आमदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिध्दार्थ साखरे, शिवणकर, उपसरपंच सुनील लांजेवार, उर्मिला कटरे, सुकलाल येरणे, हनिफ शेख, अरविंद येरणे, दिनेश राऊत, महेंद्र सोनवाने यांनी अधिकाऱ्यांना बोलावून समस्येचे निराकरण झाल्याशिवाय शाळा उघडू देणार नाही, असा पवित्रा घेतला होता. पं.स.चे खंडविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे, गटशिक्षणाधिकारी यशवंत कावळे, नायब तहसीलदार जी.आर. नागपुरे यांच्यासह पोलीसही घटनास्थळी पोहोचले. या वेळी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी गणित व विज्ञान विषयांसाठी बीएससी, बीएड शिक्षक देण्याचे लेखी आश्वासन दिले. यानंतर कुलूप उघडण्यात आले.
गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर कुलूप उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2017 12:20 AM