तिरोडा : महाराष्ट्र लोधी समाज सभेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या समस्यांना घेऊन खासदार डॉ. साक्षी महाराज यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी महाराष्ट्र राज्यातील लोधी, लोधा व लोध जातीला इतर राज्याप्रमाणेच केंद्र शासनाच्या इतर मागासवर्ग यादीत समाविष्ट करण्यासाठी पूर्णत: प्रयत्न करेन व महाराष्ट्रातील या जातीला त्यांचा हक्क मिळवूनच शांत बसेल, असे आश्वासन दिले.महाराष्ट्र राज्यात या जातीला जेव्हा राज्याच्या इतर मागासवर्ग यादीत समाविष्ट करण्यात आले आहे, मग केंद्र शासनाच्या इतर मागासवर्ग यादीत समाविष्ट करण्यात कोणती अडचण आहे. ही समस्या दूर करण्यासाठी संबंधित विभागाच्या मंत्र्यांशी परस्पर भेट घेणार, असेही साक्षी महाराज म्हणाले.महाराष्ट्र लोधी सभेचे महामंत्री राधेश्याम नागपुरे यांच्या नेतृत्वात प्रदेश उपाध्यक्ष पाडुरंग मुटकुरे यांच्यासह सदस्य झनकलाल ढेकवार, अखिल भारतीय महासभेचे कोषाध्यक्ष कल्लुसिंह लोधी, सोवससिंह राजपूत लोधी उपस्थित होते. सदर शिष्टमंडळाने त्यांना सांगितले की, राज्य शासनाने सन २००४ मध्ये राज्याच्या इतर मागासवर्ग यादीत या जातीला समाविष्ट करून घेतले आहे. परंतु केंद्राच्या यादीत प्रदेश लोधी सभेच्या सतत प्रयत्नानंतरसुध्दा आजपावेतो समाविष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार, उच्चशिक्षण घेणारे, केंद्र सरकारच्या विभागात नोकरी करणाऱ्या समाजबांधवाना मिळणाऱ्या फायद्यापासून वंचित रहावे लागत आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तराखंड, तेलगांना, छत्तीसगढ, दिल्ली, आसाम, पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान इत्यादी राज्यात केंद्राच्या इतर मागासवर्ग यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)
लोधी समाज सभेची साक्षी महाराजांना भेट
By admin | Published: December 28, 2015 2:01 AM