लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ‘आपण कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मागे घेणार नाही’ अशी राणाभीमदेवी थाटात नामांकन दाखल केल्यानंतर घोषणा करणारे भाजपाचे माजी खासदार खुशाल बोपचे यांनी निवडणुकीपूर्वीच शस्त्र खाली ठेवले. निवडणूक रिंंगणातून माघार घेताना त्यांनी राष्ट्रहिताचा आधार घेतला असला तरी वरिष्ठांचा दबाव आणि स्वहितच असल्याचे मतदार संघात बोलले जात आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात भाजपाच्या उमेदवारीसाठी माजी खासदार खुशाल बोपचे यांनी जीवाचे रान केले. मात्र पक्षश्रेष्ठींनी त्यांना डावलत भंडाराचे नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना उमेदवारी दिली. आमदार आणि खासदारकी भूषविलेल्या खुशाल बोपचे संतप्त झाले.नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यानंतर आपण कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी माघे घेणार नाही. वरिष्ठांनी कितीही दबाव आणला तरी आता माघार नाही, असे सांगितले. त्यांच्या या पावित्र्याने भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली. खुशाल बोपचे यांचा भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मोठा प्रभाव आहे. ते पोवार समाजाचे नेते असून या समाजाची मते यंदाच्या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात.त्यामुळेच भाजपाने त्यांना कोणत्याही परिस्थितीत घरी बसविण्याचा प्रयत्न सुरू केला. राणाभीमदेवी थाटात घोषणा करणारे खुशाल बोपचे अवघ्या ७२ तासातच भाजपाच्या गोटात मिळसले. पत्रपरिषद घेऊन राष्ट्रहितासाठी आता उमेदवारी मागे घेत असल्याचे स्पष्ट केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्याशी संपर्क साधला. त्यामुळेच आपण माघार घेतल्याचे सांगण्यासही ते विसरले नाही.संघर्षाचा वारसा असलेल्या बोपचेंनी उमेदवारी मागे घेताना राष्ट्रहिताचा 'पवित्र' हेतू पुढे केला असला तरी त्या मागच्या कारणांची आता भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात खुलेआम चर्चा होत आहे. स्वहितासाठी बोपचेंनी ही खेळी खेळल्याचे बोलले जात आहे. मुलाच्या राजकीय भविष्याचा विचार यामागे निश्चितच असावा.पोवार समाज कुणाच्या पाठीशीपोवार समाजाचे नेतृत्व करणारे खुशाल बोपचे यांनी रणांगणावरच शस्त्र खाली ठेवले. त्यामुळे आता पोवार समाज नेमका कोणत्या पक्षाच्या पाठीशी राहणार यावरही खल होत आहे. आपल्या समाजाच्या सक्षम उमेदवाराला भाजपाने डावलल्याने समाजात भाजपाविषयी प्रचंड नाराजी दिसत आहे. ती नाराजी मतदान यंत्रातून उतरण्याची भीती आहे.
Lok Sabha Election 2019; बोपचेंची माघार, राष्ट्रहित की स्वहित?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 9:49 PM
‘आपण कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मागे घेणार नाही’ अशी राणाभीमदेवी थाटात नामांकन दाखल केल्यानंतर घोषणा करणारे भाजपाचे माजी खासदार खुशाल बोपचे यांनी निवडणुकीपूर्वीच शस्त्र खाली ठेवले.
ठळक मुद्देदबाव कुणाचा : रणांगणातच शस्त्र ठेवले खाली