लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीतील ईव्हीएम मशिनमध्ये आलेला बिघाड लक्षात घेता निवडणूक विभागाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विशेष काळजी घेतली होती. मात्र यानंतरही गुरूवारी (दि.११) मतदान प्रक्रियेदरम्यान जिल्ह्यातील १७ मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशिन बंद पडल्याने निवडणूक विभागाची काही वेळ तारांबळ उडाली होती. मात्र निवडणूक विभागाने यंदा पर्यायी ईव्हीएम व व्हीव्हीटी पॅट मशिन उपलब्ध करुन ठेवल्याने वेळीच उपाय योजना करणे शक्य झाले.मागील वर्षीच्या लोकसभा पोटनिवडणुकीत अनेक मतदान केंद्रावरील व्हीव्हीटी पॅट मशीन बंद पडल्यामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले होते. त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांना सक्तीने गोंदियातून हटविण्यात आले होते. मात्र हा अनुभव पाठीशी असताना सुध्दा निवडणूक विभागाने त्यापासून काहीच धडा घेतला नसल्याचा अनुभव गुरूवारी (दि.११) मतदान प्रक्रियेदरम्यान आला. गोंदिया तालुक्यातील १४ ठिकाणच्या मतदान केंद्रांवरील व्हीव्हीटी पॅटमध्ये बिघाड आला होता. परंतु निवडणूक विभागाने खापर आपल्या डोक्यावर फुटू नये, यासाठी तेवढीच तत्परता अधिकाऱ्यांनी दाखवून मशीन बदलवून मतदानाची प्रक्रिया पुन्हा सुरळीत करण्यात आली. गोंदिया तालुक्यातील बुथ क्र.१३ जि.प. शाळा दासगाव बुज, बुथ क्र. २४७ नगर परिषद शाळा माताटोली गोंदिया, बुथ क्र.२७६ हिंदी प्राथमिक शाळा रामनगर, बुथ क्र. २८१ न.प.हिंदी प्राथमिक शाळा रामनगर, बुथ क्र. ३२१ मराठी प्राथमिक शाळा फुलचूर, बुथ क्र. ३२७ जि.प. प्राथमिक शाळा सेंद्रीटोला पिंडकेपार, बुथ क्र.३३९ जि.प. प्राथमिक शाळा कारंजा, बुथ क्र.३४३ जि.प. प्राथमिक शाळा तुमखेडा, बुथ क्र.११४ जि.प. हिंदी स्कूल खातीया, बुथ क्र.२४३ श्रीमती कौशल्यादेवी बजाज राजस्थानी कन्याशाळा बापूजी व्यायाम शाळा गोंदिया, बुथ क्र.३३७ जि.प. प्राथमिक शाळा रापेवाडा, बुथ क्र. २०१ न.प.मनोहर म्युनिसीपल हायस्कूल गोविंदपूर रूम नं.३, बुथ क्रमांक ७८ जि.प. शाळा चारगाव, बुथ क्रमांक २७१ सरस्वती शिशू मंदिर मूर्री रोड गोंदिया मधील व्हीव्हीटी पॅट मशीन बंद पडल्या. बुथ क्र.२४३ श्रीमती कौशल्यादेवी बजाज राजस्थानी कन्याशाळा बापूजी व्यायाम शाळा गोंदिया येथील मतदान करण्यासाठी लावलेली मशीन तीन वेळा बंद पडल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी तीन वेळा ह्या मशीन बदलवून दिल्या. तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटखेडा येथील बुथ क्रमांक २५९, २६० वर बॅलेट युनीटला बॅटरी नसल्याने या मतदान केंद्रावरील मतदान जवळपास तासभर थांबले होते. बॅटरी उपलब्ध झाल्यानंतर मतदानाची प्रक्रिया सुरळीत सुरू झाली.
व्हीव्हीटी पॅटमुळे ४५ मिनीटे मतदान बंदआमगाव तालुक्याच्या बोथली येथील बुथ क्र. ५७ मध्ये सकाळी ९ ते ९.४५ वाजता दरम्यान व्हीव्हीटी पॅट बंद पडल्यामुळे तब्बल ४५ मिनीटे मतदान होऊ शकले नाही. मतदान केंद्रावर कसलीही सोय नसल्यामुळे मतदारांना ताटकळत उन्हात उभे राहावे लागले. उन्हाचा त्रास पाहून काही मतदार मतदान न करताच परत गेले. ३ वाजतापर्यंत आलेल्या मतदारांना एक, दोन असे क्रमांक देण्यात आले. तब्बल ४५ मिनीटे मतदान बंद राहील्यामुळे ४ वाजता पर्यंत मतदानाची प्रक्रिया घेण्यात आली.