अर्जुनी मोरगाव : स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असे सिंह गर्जना करणारे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रगण्य राजकीय पुढारी लोकमान्य टिळक यांचे कार्य फार मोलाचे आहे. त्यांनी फार मोठा त्याग केला आहे. त्यांनी आपल्या चतु:सूत्रीद्वारे राष्ट्रीय शिक्षणमाध्यमातून मुलांच्या मनात देशभक्ती निर्माण केली. ज्या जन्मभूमीत मी जन्माला आलो ती जन्मभूमी पारतंत्र्यात कशी ठेवू यासाठी त्यांनी स्वातंत्र्याचा लढा दिला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे उत्कृष्ट कथालेखक होते. त्यांच्या कथा माणसाच्या हृदयापर्यंत जाऊन भिडतात. स्मशानातील सोने या कथेद्वारे जीवनासाठी संघर्ष करणाऱ्या एका सामान्य व्यक्तीची धडपड त्यांनी व्यक्त केली आहे. लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे हे ध्येयवादी देशभक्त होते, असे प्रतिपादन जीएमबी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य वीणा नानोटी यांनी केले.
सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तसेच जीएमबी कनिष्ठ महाविद्यालय संयुक्त विद्यमाने आयोजित लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पर्यवेक्षिका छाया घाटे, पर्यवेक्षक मुकेश शेंडे, सरस्वती विद्या निकेतन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हरिदास गहाणे, प्रा. यादव बुरडे, संजय बंगळे उपस्थिती होते. देवी सरस्वती, लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या छायाचित्रांचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी प्रा. इंद्रनील का शिवार यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर माहिती विशद केली. पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गटनिहाय निबंध स्पर्धेचे विषयनिहाय आयोजन करण्यात आले. प्रा. इंद्रनील का शिवार यांनी कार्यक्रमाचे संचालन करून आभार मानले. सांस्कृतिक प्रमुख कुंडलिक लोथे, अर्चना गुरनुले, प्रा. नंदा लाडसे, महेश पालीवाल, माधुरी पिलारे यांनी सहकार्य केले.