गोंदिया : स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ या रक्तदान मोहिमेला स्थानिक बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या शासकीय रक्तपेढीत शुक्रवारी (दि. २) सकाळी १० वाजता सुरुवात होणार आहे. यावेळी प्रामुख्याने जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. नरेश तिरपुडे उपस्थित राहणार आहेत.
कोरोनाकाळात रक्तदान शिबिरावरही परिणाम झाला. त्यामुळे रक्तदानाची कमतरता जाणवायला लागली. आता ती कमतरता भरून काढण्यासाठी ही रक्तदान मोहीम आयोजित करण्यात आली आहे. ‘लोकमत’च्या या उपक्रमात सर्वांनी रक्तदान हेच महान कार्य ही भूमिका घेऊन रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले. रक्त हे कोणत्याही कृत्रिम पदार्थापासून तयार करता येत नाही. त्यामुळे रक्तसंकलनाशिवाय पर्याय नाही. गोंदिया शहरासह तालुक्यातही रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या रक्तदान शिबिराला विविध सामाजिक आणि राजकीय सहकार्य करण्याकरिता युवा वर्ग तसेच सखी मंच सदस्य व वाचकवर्ग यांनी पुढे येऊन महान रक्तदान शिबिराला यशस्वी करण्याचे आवाहन लोकमत गोंदिया जिल्हा कार्यालय प्रमुख मिलिंद वाढई, लोकमत जिल्हा प्रतिनिधी अंकुश गुंडावार, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी मुकेश शर्मा यांनी केले आहे. जिल्ह्यातील लोकमत सखी मंच सदस्य तसेच वाचकवर्ग यांनी मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. २ जुलै ते १५ जुलै दरम्यान ही मोहीम जिल्हाभरात सुरू राहणार आहे. रक्तदान शिबिराच्या अधिक माहितीसाठी लोकमत इव्हेंटचे श्रीकांत पिल्लेवार (९८२३१८२३६७) यांच्याशी संपर्क साधावा.
........................
आमगाव येथे १० रोजी
आमगाव : लोकमत आणि भारतीय विद्यार्थी संघटना आमगाव यांच्या लोकमत रक्ताचे नाते या मोहिमेअंतर्गत रक्तदान शिबिर १० जुलै रोजी सकाळी १० वाजता बनगाव येथील श्री महादेवराव शिवणकर अध्यापक विद्यालय, सरस्वती विद्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे. रक्तदात्यांनी यात सहभागी होऊन रक्तदान करावे असे लोकमत प्रतिनिधी राजीव फुंडे ९४२३३८४१२२, भारतीय विद्यार्थी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष विद्या सिंगाडे, जिल्हा अध्यक्ष निखिल बंसोड यांनी कळविले आहे.
.............
तिरोडा, सालेकसा, सडक अर्जुनी येथे होणार शिबिर
‘लोकमत रक्ताचं नातं’ या रक्तदान मोहिमेंतर्गत तिरोडा येथे ११ जुलै, सालेकसा येथील एम. बी. पटेल महाविद्यालयात ३ जुलै रोजी आणि सडक अर्जुनी येथे सुध्दा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
......