गोंदिया : गोंदिया व तिरोडा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. गोंदिया शहरातील ३ प्रभाग अतिसंवेदनशील तर ४ प्रभाग संवेदनशील असल्याचे प्रशासनाचे म्हणणे असल्याने त्या केंद्रावर पोलिसांची करडीनजर राहणार आहे. गोंदिया शहराच्या १४ प्रभागांसाठी १४३ मतदार केंद्र तर रामनगरच्या सात प्रभागासाठी ४७ मतदान केंद्र, तर तिरोड्याच्या तीन प्रभागासाठी १६ मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. परंतु पोलीसांनी प्रभाग क्र. १, १२ व १३ ला अतिसंवेदनशील ठरविले आहे. त्या प्रभागात मरारटोली, नप शाळा, रामनगर हिंदी शाळा, रामनगर म्युनिसिपल शाळा, सुर्याटोला संत गाडगेबाबा शाळेत असलेले केंद्र अतिसंवेदनशील आहेत. संवेदनशील केंद्रामध्ये ५, ९, १०, ११ या प्रभागांचा समावेश आहे. या प्रभागातील सर्वच केंद्रावरकरडी नजर राहणार आहे. गोंदिया शहरात शांततेच्या मार्गाने नगर परिषदेची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडावी यासाठी सर्व हालचालींवर पोलिसांची करडी नजर आहे. पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांनी दोन प्रभागांचा एक गट तयार करून त्या प्रत्येक गटामागे एक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक व २५ कर्मचारी असा चोख बंदोबस्त लावला आहे. प्रचारादरम्यान कोणताही हिंसाचार होऊ नये, अनिष्ठ प्रथांना आळा बसावा, तसेच मतदान, मतमोजणीदरम्यान घटना घडू नयेत यासाठी पध्दतशिर बंदोबस्ताची आखणी केली. पोलीसांना टाटा सुमो, जीप, लाईट व्हॅन, मोठे वाहन, वायरलेस सेट, हेल्मेट, ढाल, सिंगार्ड, रायफल पार्टी, गॅसगण मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आले. नक्षलग्रस्त भागातील सी-६० कमांडो वगळता सी-६० चे आठ पथके राखीव ठेवण्यात आलेली आहे. एसआरपी कंपनी राहणार आहे. पोलीस अधीक्षक १, उपविभागीय पोली अधिकारी २, पोलीस निरीक्षक ११,पोलीस उपनिरीक्षक २२,पोलीस कर्मचारी २७५, होमगार्ड ३५०, सीआरपीएफ १, सी-६० कंपन्या बंदोबस्तात आहेत.(तालुका प्रतिनिधी)
अतिसंवेदनशील केंद्रांवर पोलिसांची करडी नजर
By admin | Published: January 08, 2017 12:14 AM