राजीव फुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : तालुक्यातील रेती घाटावरून रेतीचा अवैध उपसा सुरूच आहे. पहाटेपासून रेती घाटावर वाहनांच्या रांगा लागत असल्याचे चित्र आहे. दरम्यान रेती माफियांनी कारवाई टाळण्यासाठी आपले नेटवर्क तयार केले आहे. यासाठी चक्क तहसीलदारांच्या घरावर नजर ठेवली जात असून ते कधी बाहेर जातात याची पाहणी केली जात असल्याची माहिती आहे.आमगाव तालुक्यातील रेती घाटाचे काही निकषांमुळे अद्यापही लिलाव करण्यात आले नाही. त्यामुळे रेती माफीया याचा फायदा घेत असून रेती घाटावरुन मोठ्या प्रमाणात जेसीबी लावून रेतीचा उपसा करीत असल्याचे चित्र आहे. विशेष तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या कारवाहीपासून वाचण्यासाठी चक्क त्यांच्या घरावरच नजर ठेवण्यास रेती माफीयांनी सुरूवात केली असल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे रेती माफीयांचे नेटवर्क किती स्ट्रांग आहे हे दिसून येते. लांजी रोडवरील वाघनदी (महारीरोटा) घाटावर मोठ्या प्रमाणात रेती साठा उपलब्ध आहे.या रेती घाटांचा लिलाव करण्यात आला नाही. मध्यप्रदेश आणि महाराष्टÑाचे रेती घाट लागून असल्याने काही रेती माफीया मध्यप्रदेशच्या रायल्टीवर महाराष्टÑातील रेती घाटावरुन रेतीचा उपसा करीत असल्याची बाब पुढे आली आहे. तर काही रेती माफीया १० ट्रॅक्टर रेतीचा उपसा करण्याची रॉयल्टी घेवून २० ते २५ ट्रॅक्टर रेतीचा उपसा करीत आहे. यामुळे शासनाचा महसूल सुध्दा मोठ्या प्रमाणात बुडत आहे. महाराष्ट्रात असलेल्या महारीटोला घाटावर रेतीची किंवा जागेची मोजणी केल्यास रेतीचा अवैध उपसा होत असलेल्या प्रकाराचा पूर्णपणे खुलासा होईल. आमगाव शहरात रात्री २ वाजतापासून रेतीची तस्करी केली जात असल्याचे चित्र पाहयला मिळते. महसूल विभागाचे अधिकारी गस्तीवर निघतात. मात्र त्यांच्या कारवाहीपासून वाचण्याकरिता ट्रॅक्टर मालक यांनी तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या घरासमोर पाळत ठेवण्यासाठी एका व्यक्तीची नियुक्ती केली आहे. हे अधिकारी घरातून निघाले की मोबाईलद्वारे अन्य मालक व चालकांना सावधान केले जाते. हा प्रकार आता नित्याचाच झाला आहे. ट्रॅक्टर मालकांची शहरात पहाटेपासूनच रेलचेल दिसून येते. लोकमत चमूनी फेरफटका मारला असता ट्रॅक्टर मालकांची मैफील कामठा चौक, लांजी रोड, आंबेडकर चौक, सालेकसा रोड आणि द्वारकाधाम, अनिहा नगर, देवरीरोड या परिसरात असल्याचे आढळले. ते सुध्दा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर सुध्दा नजर ठेवून असतात. आमगाव शहरात सध्या गल्लोगल्ली घराचे बांधकाम सुरु आहे. यासाठी रेतीची मागणी वाढली आहे. त्यामुळे रेती माफीया अधिक दराने रेतीची विक्री करीत असल्याचे चित्र आहे.रेती माफिया अधिकाऱ्यांवर पाळत ठेवीत असल्याची माहिती आहे. पण आम्ही कुठल्याही भ्याड धमक्यांना कर्तव्यावर असल्यावर घाबरत नाही. रेतीची चोरी करणाºयांवर कडक कारवाई केली जाईल.- एस. एम. नागपुरे, नायब तहसीलदार, आमगाव.
रेती माफियांकडून तहसीलदारांच्या घरावर नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 9:42 PM
तालुक्यातील रेती घाटावरून रेतीचा अवैध उपसा सुरूच आहे. पहाटेपासून रेती घाटावर वाहनांच्या रांगा लागत असल्याचे चित्र आहे. दरम्यान रेती माफियांनी कारवाई टाळण्यासाठी आपले नेटवर्क तयार केले आहे.
ठळक मुद्देकारवाई टाळण्यासाठी नेटवर्क : रॉयल्टी नियमाचे सर्रास उल्लंघन