गोंदिया : कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दीड वर्षापासून बऱ्याच रेल्वेगाड्या बंद आहेत, तर रेल्वे विभागाने काही विशेष गाड्या सुरू ठेवल्या आहेत. मात्र, या गाड्यांचे तिकिटाचे दर नियमित तिकिटांपेक्षा दुप्पट आहेत. गोंदिया ते तुमसर हे ४९ कि.मी.चे अंतर असून, यासाठी आरक्षित तिकिटाचे दर १७५ रुपये आहे. विशेष म्हणजे एवढ्याच भाड्यात पूर्वी गोंदिया ते नागपूर जाणे शक्य होते. म्हणजे ४९ कि.मी.च्या अंतरासाठी आता प्रवाशांना दीडशे कि.मी.चे भाडे मोजावे लागत आहे. गोंदिया रेल्वे स्थानकावरून सध्या ४७ गाड्या नियमित धावत असून, त्यात विशेष गाड्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रीमियम तिकीट दराचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रवासीसुद्धा आता संतापले असून, आणखी किती दिवस हा भुर्दंड सहन करावा लागणार, असा सवाल करीत आहेत.
.............
आपल्या जिल्ह्यातून जाणाऱ्या विशेष रेल्वेगाड्या
छत्तीसगड-अमृतसर एक्स्प्रेस
हावडा-मुंबई मेल
जबलपूर-चांदाफोर्ट
अजमेर-पुरी एक्स्प्रेस
समता एक्स्प्रेस
गीतांजली एक्स्प्रेस
..................
तिकिटाचे दर दुप्पटच
- कोरोनाचा संसर्गामुळे रेल्वे विभागाने अद्यापही नियमित गाड्या सुरू केल्या नाहीत. तर नियमित गाड्यांनाच विशेष गाड्यांचा दर्जा देऊन तिकीट दरात दुप्पट वाढ केली आहे.
- विशेष गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी आरक्षण करणे अनिवार्य असून, त्याचे दर हे नियमित तिकिटापेक्षा दुप्पट असल्याने प्रवाशांना भुर्दंड सहन करावा लागत आहे.
- आता कोरोनाचा संसर्ग आटाेक्यात आला असून, नियमित गाड्या सुरू करून तिकिटाचे प्रीमियम दर करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
...........
ही लूट कधी बंद होणार?
विशेष गाड्यांच्या नावाखाली आकारले जाणारे तिकिटांचे दर कधी कमी होणार आणि लोकल व पॅसेंजर गाड्या केव्हापर्यंत सुरू यासंदर्भात रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी यासंदर्भात रेल्वे बोर्डाकडून अद्यापही कुठलेही निर्देश मिळाले नसल्याचे सांगितले.
............
प्रवासी वैतागले.......
रेल्वेने कोरोनाचा संसर्गाचा बहाणा सांगत विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. याचे तिकीट दर दुप्पट असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कोरोनामुळे आधीच पगारात कपात झाली असून, खर्च मात्र तिप्पट वाढला आहे.
- आशिष कावळे, प्रवासी
............
कोरोनाचा संसर्ग आता आटोक्यात आला असून, परिस्थिती सामान्य झाली आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने आता नियमित गाड्या सुरू करून प्रीमियम तिकिटाचे दर कमी करण्याची गरज आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडत चालले आहे.
- मनोज आगलावे, प्रवासी
...........
किमान १०० : रेल्वे विभागाने ४९ कि.मी.च्या प्रवासाठी विशेष गाड्यांमध्ये १५० कि.मी.चे प्रवास भाडे आकारून प्रवाशांच्या खिशावरील भार वाढविला आहे.
कमाल ३०० : विशेष गाड्यांचे तिकीट दर आकारताना कुठला निकष लावून भाडे दुप्पट करण्यात आले हे मात्र समजण्याच्या पलीकडे आहे.
.............