गोंदिया : रेल्वेत आकस्मिक तिकीट तपासणी अभियान सुरू करून दंड वसूल केला जात असला तरी यात ७० टक्के लोकांकडून बिनापावतीचा दंड वसूल केला जात आहे. विनापावतीचा दंड सरसकट तिकीट तपासणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या खिशात जातो. तर ज्या दंडाची पावती फाडली जाते तेवढा महसूल रेल्वेला मिळतो.मुंबईवरून येणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसच्या जनरल बोगीमध्ये नागपूर ते गोंदियापर्यंत तिकीट तपासणारे रेल्वेचे कर्मचारी प्रवाशांची लूट करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. नागपूर, कामठी, भंडारा, तुमसर, तिरोडा व गोंदिया असे या एक्स्प्रेस गाडीचे थांबे आहेत. तिकीट तपासणी अभियानात अनेक प्रवासी विनातिकीट असल्याचे आढळते. मात्र तिकीट तपासणी करणारे रेल्वेचे कर्मचारी १०० ते ५०० रूपयांपर्यंत विनापावतीचा दंड प्रवाशांकडून वसूल करून त्यांना सोडून देतात. तर काही मंथली पासधारक या जनरल बोगीमधून प्रवास करतात. अशावेळी त्यांच्याकडे सुपरफास्ट वगळता सामान्य पास असली तर हेच तिकीट तपासणी करणारे रेल्वे कर्मचारी त्यांना सुपरफास्टची पास किंवा तिकीट नसल्यामुळे दंड व शिक्षा होईल, असे धमकावतात. तसेच मोठ्या रकमेची मागणी करतात. साहजिकच तेवढी रक्कम भरण्यास प्रवासी तयार नसतात. याचाच लाभ घेऊन अशा पासधारकांकडूनही विनापावतीचा दंड घेऊन टीटीसी आपले खिशे गरम करून घेतात. गुरूवार (दि.२३) रोजी मुंबईवरून येणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसमध्ये तिरोडा रेल्वेस्थानकावर समोरच्या जनरल बोगीत एक महिला व पुरूष तिकीट तपासणी करणारे रेल्वेचे दोघे कर्मचारी शिरले. त्यांनी काही विनातिकीट प्रवाशांना पकडले व त्यांच्यावर विनापावतीचा दंड आकारला. त्यापैकी केवळ एकच विनातिकीट प्रवाशाला दंडाची पावती देण्यात आली. तर साध्या पासधारकांकडून सुुपरफॉस्टची पास नसल्याचे सांगून १००-१०० रूपये घेवून सोडण्यात आले. हा दंड सुद्धा विनापावतीचाच होता. या प्रकारामुळे विनातिकीट प्रवास व अनियमित तिकीट प्रवास या बाबींचा चालना मिळत आहे. तर दुसरीकडे रेल्वेचा महसूल बुडत असून तिकीट तपासणी करणाऱ्यांमध्ये भ्रष्टाचाराची प्रवृती बोकाळत आहे. (प्रतिनिधी)
तिकीट तपासणी अभियानाच्या नावे प्रवाशांची लूट
By admin | Published: June 27, 2016 1:51 AM