गोंदिया : आमगाव येथील रिसामा रोडवरील जय ट्रेडर्स फर्ममध्ये पाच-सहा लाख रुपयांची चोरी करून २५ कोटींचे नुकसान करणाऱ्या ३२ जणांच्या विरोधात जयप्रकाश नथमल भट्टड यांनी तक्रार दिली आहे. भाड्याने घेतलेले कार्यालय रिकामे करण्याच्या उद्देशातून हे कृत्य करण्यात आल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे.
आमगावच्या विद्यानगरीतील जयप्रकाश नथमल भट्टड यांनी रिसामा येथील कुंजीलाल माहेश्वरी यांच्या मालकीचे भूमापन क्र. ११७, शीट नं. २ या जागेतील इमारत ५ हजार रुपये किमतीवर भाड्याने घेतली होती. तेथे जय ट्रेडर्स फर्म उघडून कारभार सुरू होता. त्या कार्यालयातून जयप्रकाश यांच्यासोबत भागीदारी व्यवसाय मे.डी.के. सरटेक्स (आमगाव), आम मुख्तारदार मे. अमृतलाल ॲण्ड कंपनी (आमगाव), मे. गणेश राईस मिल (आमगाव) तसेच जय ट्रेडर्स संचालक म्हणून खान्देश एक्सट्रेक्सन लिमिटेड (गोंदिया) व इतर व्यावसायिक त्या इमारतीत काम करीत होते. मागील २० वर्षांपासून त्या कार्यालयात भट्टड वही खाते व कोर्टाचे काम बघत होते.
त्यांचे भागीदार म्हणून गोकूलदास द्वारकादास फाफट व श्यामसुंदर परमसुख फाफट तसेच त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्ती या कार्यालयातून कामकाज बघत होते. पाच हजार रुपये भाड्याने घेतलेली इमारतीचे १ एप्रिल २०१८ पासून जय ट्रेडर्स या फर्ममधून भाडे देत होते. या कार्यालयातील संगणक साहित्य, इलेक्ट्रॉनिक डाटा, इलेक्ट्रिक साहित्य, लॅपटॉप, पेनड्राईव्ह, हार्डडिस्क यामध्ये फेरबदल करून कार्यालयामधून ५ ते ६ लाख रुपये रोख रक्कम चोरून नेले. कार्यालयाची तोडफोड करून २५ ते ३० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे जयप्रकाश भट्टड यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात आमगाव पोलिसांनी आरोपी सुनील सत्यनारायण भुतडा (५०), अभिनव कृष्णकुमार माहेश्वरी (२८), दीपक कुंजीलाल भुतडा (५६) व इतर काही व्यक्तींवर आमगाव पोलिसांनी भादंविच्या कलम १२० (अ), १८८, ३७८, ३७९ (अ), ३८०, ४२२, ४२४, ४२५, ४४१, ४४२, ४४५, ४६१,५०४,५०६ सहकलम ४३,६५ माहिती तंत्रज्ञान अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक विलास नाळे करीत आहेत.
....................................
न्यायालयाची केली अवमानना
या कार्यालयासंदर्भात आमगाव न्यायालयात प्रकरण सुरू असताना आरोपींनी न्यायालयाचा अवमान करून तोडफोड केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्या कार्यालयामध्ये असलेली रोख रक्कम, सर्व दस्तावेज व चोरी केल्यामुळे सध्या व्यापारी लोकांपासून जी वसुली करायची होती, कोर्ट केसमध्ये जे दावे प्रलंबिंत आहेत त्याचे दस्तावेज व अन्य असे २५ ते ३० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
बॉक्स
तक्रारकर्त्यांची सर्व कागदपत्रे आरोपींनी नेली
जय ट्रेडर्समधील सर्व रेकाॅर्ड, काॅम्प्युटर रेकार्ड, फर्निचर, लॅपटॉप, संगणक, पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क, ५० पेक्षा अधिक प्रलंबित कोर्ट प्रकरणाची फाईल, रोख रक्कम, ओरिजनल फाईल्स, खरेदी-विक्री पत्र, वहीखाते, जुने रिक, ऑफिस सिल, माहिती अधिकार अंतर्गत प्राप्त माहिती, इन्कमटॅक्स व सेल्स टॅक्सची फाइल व रिकर्ड, ऑडिटचे रेकाॅर्ड, व्यापारिक महत्त्वपूर्ण माहिती, पोलीस तक्रार, शेयर सर्टिफिकेट, वसियत, पासपोर्ट, रेल्वे टिकीट, आरोपींचे कौटुंबिक सदस्य आणि त्यांच्या संबंधित सर्व व्यापारिक फर्माना व भट्टड यांचे अन्य दस्तावेज चोरून नेल्याची तक्रार पोलिसांना दिली.