अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी हा परिसर निसर्गाने नटलेला आहे. या परिसरात राहणाऱ्या लोकांसाठी मनमोहक असे निसर्गरम्य वातावरण आहे. परिसरातील जंगलात बहुपयोगी वनसंपत्तीसह टेंभरे, चारबिया, कवठ अशी विविध प्रकारची रानमेवा देणारी झाडे होती, परंतु वृक्षकटाईमुळे ही झाडेच नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. जंगलातील गोड फळे देणारी झाडेच नष्ट केल्याने रानमेव्याची चव हल्लीच्या काळात चाखायला मिळत नाही. उन्हाळ्याच्या दिवसात अनेक गरीब लोक जंगलात जाऊन फळे आणत असत आणि शहरात नेऊन विकत असत. काही लोक गावातील शाळेच्या गेटजवळ बसून टेंभरे चारबिया विकत असत. त्यामुळे त्यांना थोडाफार रोजगार मिळून जात होता. जंगलातील औषधीयुक्त गुणधर्म असलेल्या टेंभरे, चारबिया यासारखी फळांच्या झाडांची प्रजाती नष्ट करून टाकल्या आहेत. त्यामुळे आता या रानमेवा फळांकडे दुर्लक्ष झाले असावे;मात्र हे निश्चित निसर्गाने दिलेल्या रानमेव्याची चव नाहीशी करण्यासाठी मानव जातच जबाबदार असून त्यामुळेच हल्लीच्या पिढीला रानमेव्यांची चव चाखायला मिळत नाही.
जंगलातील रानमेव्याची चव हरविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 4:30 AM