कपिल केकत
गोंदिया : आरटीई प्रवेशाला घेऊन शिक्षण विभागाकडून सोमवारपर्यंत (दि. २२) मुदत वाढवून देण्यात आली होती. यानंतर जिल्ह्यातील ६४४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. ही शेवटची मुदतवाढ देण्यात आली होती व त्यामुळे निवड यादीतील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रकिया पूर्ण झाली आहे. यानंतर आता प्रतीक्षा यादीतील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी ३० मेपासून १२ जूनपर्यंत त्यांना मुदत देण्यात आली आहे.
शिक्षणापासून एकही मूल वंचित राहू नये, यासाठी शासनाने शिक्षणाचा अधिकार लागू केला आहे. या अंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला-मुलींसाठी आरक्षित करण्यात येतात. यंदा जिल्ह्यातील १३१ शाळांमध्ये ८६४ जागा आरटीई अंतर्गत आरक्षित असून, त्यासाठी ५ एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या सोडतीत ८६३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यानंतर लगेच पालकांनी कागदपत्रांची पडताळणी करून २५ एप्रिलपर्यंत प्रवेश निश्चित करावयाचे होते. मात्र, त्या मुदतीत बहुतांश मुलांचे प्रवेश निश्चित झाले नाहीत. परिणामी, ही मुदत वाढवून देण्यात आली होती व असे करीत सोमवारपर्यंत (दि. २२) मुदत वाढवून देण्यात आली होती. ही मुदतवाढ अंतिम होती व यानंतरही ६२४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
परिणामी, आता निवड यादीतील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामुळे आता प्रतीक्षा यादीतील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची एक प्रकारे लॉटरीच लागली असून, आता त्यांना प्रवेश घेता येणार आहे. यासाठी ३० मेपासून १२ जूनपर्यंत त्यांना मुदत देण्यात आली आहे. अशात आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी ही संधी हातातून जाऊ न देता लगेच प्रवेश निश्चित करणे गरजेचे आहे.
देवरी तालुक्यात अत्यल्प प्रतिसाद
- आरटीई प्रवेश अंतर्गत निवड यादीतील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडून कित्येकदा मुदत वाढवून देण्यात आली. यात अर्जुनी-मोरगाव तालुक्याने उत्कृष्ट कामगिरी केल्याचे दिसत असून, तेथे ८८ पैकी ७३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. त्याची ८२.९५ एवढी टक्केवारी असून, अर्जुनी-मोरगाव तालुका प्रथम क्रमांकावर आहे. तर आमगाव तालुक्यातील ८९ पैकी ७३ प्रवेश निश्चित झाले व त्याची ८२.०२ एवढी टक्केवारी असून, तालुका दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, देवरी तालुक्यात प्रक्रियेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून, ४६ पैकी फक्त २८ प्रवेश निश्चित झाले. त्याची ६०.८७ एवढी टक्केवारी असून, देवरी तालुका जिल्ह्यात माघारलेला आहे.
प्रतीक्षा यादीतील २१४ विद्यार्थ्यांची निवड
- निवड यादीतील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यानंतर आता प्रतीक्षा यादीतील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे. यासाठी २१४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ३० मे ते १२ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अशात पालकांनी लवकरात लवकर त्यांच्या पाल्यांचे प्रवेश निश्चित करून सुदैवाने मिळालेल्या संधीचे सोने करून घेण्याची गरज आहे.
प्रतीक्षा यादीतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा तक्ता
तालुका - शाळा - निवड विद्यार्थी
- आमगाव - ११ - १६
- अर्जुनी-मोरगाव - १३ - १२
- देवरी - ०७ - १८
- गोंदिया - ५० - १०१
- गोरेगाव - १५ - ११
- सडक-अर्जुनी - १० - ११
- सालेकसा - ०५ - ११
- तिरोडा - २० - ३४