केशोरी : या परिसरात रब्बी धान पिकाशिवाय बऱ्याच शेतकऱ्यांनी मका पिकाची लागवड केली आहे. सध्या काही शेतकऱ्यांनी मका पिकाची मळणी केली तर काही शेतकरी मका मळणी करण्याच्या तयारीत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी मळणी करून आधारभूत खरेदी केंद्रावर द्यावा किंवा नाही याचा विचार करीत आहेत. शासकीय आधारभूत केंद्राकडून खरीप हंगामात विकलेले धानाची चुकारे अजूनही मिळाली नाहीत. ही संधी खासगी व्यापाऱ्यांनी साधून मका पिकाला खासगी व्यापाऱ्यांकडून अल्पभाव देऊन लूट केली जात आहे.
खासगी व्यापाऱ्यांकडून मका पिकाचा प्रतिक्विंटल १५०० ते १६०० रुपये एवढाच भाव दिला जात आहे. या भावात मका पिकाचा उत्पादन खर्चसुद्धा निघत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक थांबविण्यासाठी शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर मका पिकाची खरेदी सुरू करण्याची मागणी मका उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पाणी सिंचनाची व्यवस्था करून खरीप आणि रब्बी हंगामात धानाची लागवड करून उत्पन्न घेतात. परंतु दरवर्षी नैसर्गिक वातावरणामुळे धानाचे उत्पादन निघत नसल्यामुळे धान लागवड क्षेत्र कमी करून त्या ठिकाणी मका पिकाची लागवड केली आहे. मका पिकापासून अपेक्षित लाभ मिळेल या आशेवर असतानाच शासकीय खरेदी केंद्रावर मका पीक खरेदी करणे सुरू नसल्याने खासगी व्यापाऱ्यांना मका पीक विकल्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. खासगी व्यापऱ्यांकडून मका पिकाला अत्यल्प भाव देऊन शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहेत. धान पिकापेक्षा मकापिकाचे चांगले उत्पादन होत असल्याने मका उत्पादक शेतकरी समाधानी आहे. धानाच्या शेतीत झालेले नुकसान मका पिकापासून भरून निघेल, या आशेवर शेतकरीवर्ग आहे. परंतु शेतकऱ्यांना मकापिकाचे हमीभाव खासगी व्यापाऱ्यांकडून मिळत नसल्याने ही पिळवणूक थांबविण्यासाठी शासकीय खरेदी केंद्रात मका खरेदी करणे सुरू करावी, अशी मागणी मका उत्पादक दिनेश पाटील रहांगडाले व शेतकऱ्यांनी केली आहे.