नरेश रहिले, गोंदिया : शेअर मार्केटमध्ये गुंतवा आणि दहापट रक्कम घ्या असे आमिष देऊन रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कुडवा येथील एलआयसी एजंट कैलासचंद्र असाटी (७१) यांची तब्बल ३ लाख ७३ हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. या संदर्भात अरिया, जय मेहता, विवेक शर्मा या नावाच्या तीन अनोळखी व्यक्तींवर गोंदिया शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार २३ मार्च २०२३ ला कैलासचंद्र यांच्या व्हॉट्सॲपवर अरिया नावाच्या व्यक्तीने त्यांना (११९) इंडियन वेल्थ क्रियेटर नावाच्या ग्रुपला जॉइन केले. २५ मार्च २०२४ रोजी पुन्हा त्यांच्या व्हॉट्सॲपवर लिंक पाठविली. अरिया नावाच्या व्यक्तीने ती लिंक ओपन करण्यास सांगितले. अरिया नावाच्या व्यक्तीच्या मेसेजवरुन कैलासचंद्र यांनी ती लिंक जॉइन केली. त्या व्हॉटस्ॲप ग्रुपवर अरिया, जय मेहता, विवेक शर्मा हे तिघे जण रोज मेसेजद्वारे त्यांची गोल्ड मॅन सच नावाच्या कंपनीच्या शेअर्स मार्केटबद्दल माहिती देत होते. ते मेसेजमध्ये सांगत की, त्यांच्या मार्फत शेअर्स मार्केट मध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला तुमच्या रकमेच्या दहा पट फायदा होणार आहे.
२३ एप्रिल रोजी विवेक शर्मा नावाच्या व्यक्तीने ४० (द) कस्टमर सर्व्हिस नावाच्या ग्रुपवर त्यांना जोडले. तो त्या ग्रुपचा ॲडमिन असून त्यामध्ये त्याच्या तीन मोबाईल नंबरचा समावेश आहे. विवेक शर्मा याने व्हॉट्सॲप ग्रुपवर मेसेज करून तुम्हाला गाेल्ड मॅन सच सेक्युरिटीज इंटर्नल स्टॉक अकाऊंट ओपन करायचे आहे का? असे विचारले. त्यावर कैलासचंद्र यांनी होकार दिला असता त्याने त्यांचा आधारकार्ड व बँक डिटेल्स मागितले. त्याला आधारकार्ड, एस. बी. आय, बँक खात्याचे डिटेल्स व एक फोटो त्याला व्हाॅटस्ॲप ग्रुपवर पाठविला. २५ मार्च २०२४ पासून दहा पट रक्कम करून देण्याच्या नावावर कैलासचंद्र असाटी यांची ३ लाख ७५ हजाराने फसवणूक केली. आरोपींवर भादंविच्या कलम ४२०, ३४, सहकलम ६६ (डी) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
फसवणूक करणाऱ्यांना अशी दिली रक्कम
कैलास असाटी यांना फोन आल्यावर त्यांनी २४ एप्रिल रोजी ४८ हजार रूपये आरटीजीएस मार्फत पाठविले. विवेक शर्मा याने पुन्हा मेसेज करून पोझिशन बिल्डिंगमध्ये कमीत कमी २ लाख रूपये करणे गरजेचे आहे. त्यासाठी अडीच लाख रूपये त्यात टाका असे सांगितले. ते पैसे टाकले. त्यानंतर विवेक शर्मा याने कैलासचंद्र यांना व्हॉटस्ॲपवर मॅसेज करून तुमच्या अकाउंटला ५० लाख जमा झाले आहेत. तुम्हाला ही रक्कम हवी असेल तर तुम्हाला अजून ७५ हजार रूपये पाठवावे लागतील असे सांगितले. ७ मे रोजी विवेक शर्मा याच्या खात्यावर ७५ हजार रूपये टाकले.१० लाख काढण्याचे नाव घेताच त्यांना केले ग्रुपमधून आऊट
७ मे रोजी सायंकाळी ५ वाजता कैलासचंद्र असाटी यांच्या खात्यावर ५० लाख ११ हजार ९७२ हजार रूपये जमा झाल्याचा मॅसेज आला. त्यानंतर १७ मे रोजी कैलासचंद्र यांना पैशाचे काम असल्याने त्यांनी विवेक शर्मा यांना व्हॉट्सॲपवर मॅसेज करून आपल्या अकाउंटवर असलेल्या रकमेपैकी १० लाख रूपये परत हवे आहे असे म्हटले असता विवेक शर्मा याने त्यांना त्यांच्या व्हॉट्सॲपवरील ग्रुपमधून बाहेर काढले.