मोरगाव ग्रामपंचायतचा पुढाकार : मासेमारांना रोजगार मिळण्याची आशा संतोष बुकावन। लोकमत न्यूज नेटवर्क अर्जुनी-मोरगाव : गावात तलाव तर आहे. पण त्या तलावाच्या पाण्याचा सिंचनासोबत मासेमारांना उदरनिर्वाहाचे साधन व्हावे, यासाठी मोरगावच्या ग्रामपंचायतने पुढाकार घेतला व महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात पहिली मत्स्यबीय तळी तयार केली. यामुळे स्थानिक मासेमारांना बारमाही रोजगार उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. गोंदिया पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित १०० हेक्टरपेक्षा अधिक शेतजमिनीला सिंचनाचचे पाणी उपलब्ध करुन देणारा मामा तलाव मोरगाव येथे आहे. येथे ढिवर समाजाची सुमारे ६० कुटूंब आहेत. याच गावात केवळराम मत्स्यमार संस्था आहे. मात्र समाजाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यांना बारमाही रोजगार नाही. हक्काची शेती नाही. या समाजाच्या आस्थापनासाठी कायमस्वरुपी बारमाही रोजगार उपलब्ध व्हावा. यासाठी जि.प. सदस्य गिरीष पालीवाल, सरपंच भूमिता लोधी, उपसरपंच राजू पालीवाल यांनी पुढाकार घेतला. मग्रारोहयो योजनेतून मत्स्यबीज निर्मितीसाठी तळी तयार करता येईल, का याचा खंडविकास अधिकारी एन.आर. जमईवार यांच्याशी चर्चा करुन पाठपुरावा केला. तब्बल सहा महिन्याने त्यांच्या प्रयत्नाला यश आले. अवघ्या १ लक्ष ४८ हजार ३१४ रुपयात ही मत्स्यबीज तळी तयार झाली. मनरेगा अंतर्गत १९ बाय १९ मीटर आकाराची तळी तयार झाली. ही सध्या ग्रा.पं.च्या अखत्यारित येते. या तळ्याची खोली ३ मिटर आहे. मोटरपंपद्वारे तलावातील पाणी या तलावात साठवले जाते. सध्या याठिकाणी मत्स्यजीरे तयार करण्याची प्रक्रिया सुरु आहे. जातीन मत्स्यअंडी घालून तिथे उगवायची. चार दिवसानंतर ते छोट्या टाकीत घालून त्याचे संवर्धन करायचे व बोटूकली झाल्यानंतर मोठ्या टाकीत व त्यानंतर तलावात सोडायचे. १ वर्षात सुमारे १ ते सव्वा किलोची मासोळी तयार होणार आहे. सध्या तलावात कतला जातीच्या मासोळीने ५६ कप्पे अंडी उगवण्यासाठी तलावात तयार करण्यात आले आहेत. एका कप्प्यात उत्तम यश आल्यास सुमारे १ लाख मत्स्य जिरे तयार होत असल्याचे मोतीराम मेश्राम यांनी सांगितले. हे मत्स्य जिरे कुणालाही विक्री न करता आम्हीच तलावात मासोळी तयार करणार असल्याचे ते म्हणाले. मोरगाव येथील मत्स्यसंस्था यापुर्वी मत्स्य जिरे विकून घेऊन तलावात घालायाची. यातून पोटभरण्याऐवढेही उत्पन्न येत नसे. आता मात्र स्वत: उत्पादन करायला सुरुवात केल्याने चांगला नफा होण्याचा विश्वास आहे.संस्थेचे अध्यक्ष कैलास चाचेरे, ग्रा.पं.सदस्य दयाराम सोनवाने, मधू दिघोरे, विठ्ठल सोनवाने, मोतीराम मेश्राम, रोजगार सेवक परसराम लाडे यांचे योगदान महत्वपूर्ण आहे.
मग्रारोहयोची मत्स्यबीज तळी ठरतात वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:25 AM