दोघांनी केले परत : एफआयआर करण्याचे प्रशासनाचे आदेश लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : गोरेगाव तालुक्याच्या ग्राम पंचायत पिंडकेपार अंतर्गत करण्यात आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात ११ लाख रूपयाच्या निधीची अफरातफर करण्यात आली. अपहार झालेली रक्कम वसुल करण्यात यावी असे आदेश खंडविकास अधिकारी यांना देण्यात आले होते. परंतु त्यांनी सदर रक्कम वसुल न केल्यामुळे सदर प्रकरणातील दोषींवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे. गोरेगाव तालुक्याच्या पिंडकेपार येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात गैरव्यवहार झाल्याची तक्रार गावातील सुजान नागरिक राजेंद्रसिंह राठोड यांनी १५ डिसेंबर २०११ रोजी केली होती. या तक्रारीच्या आधारे करण्यात आलेल्या चौकशीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे लक्षात आले. सदर प्रकरणी ग्राम पंचायत पिंडकेपार येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना योजनेच्या कामातील अपहार झालेली रक्कम पंचायत समिती गोरेगाव येथील मनरेगाच्या प्रशासकीय फंडात जमा करण्याकरिता आदेश खंड विकास अधिकारी यांना देण्यात आले होते. परंतु खंडविकास अधिकारी यांनी या संदर्भात अहवाल जिल्हा परिषदेला पाठविला नव्हता. या घोटाळ्यातील रक्कम वसूल करण्याला प्रथम प्राधान्य द्यावे, या आशयाचे पत्र खंडविकास अधिकारी यांना ३० मार्च २०१७ ला देण्यात आले होते. परंतु खंडविकास अधिकारी यांनी या संदर्भात जिल्हा परिषदेला अहवाल पाठविला नाही. सदर प्रकरणी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून अपहार करण्यात आलेली रक्कम वसूल न झाल्यास महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा २००५ नुसार एफआयआर करावे, तसा अहवाल तत्काळ कार्यालयास सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेने दिले आहे. वर्तमान बीडीओ उदासीन का? चौकशीत ११ लाखाचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाल्यावर जिल्हा परिषदेने गोरेगावचे खंडविकास अधिकारी यांना ११ फेब्रुवारी २०१४ व १९ डिसेंबर २०१३ ला पत्र देऊन त्यांच्याकडून वसुली करण्याचे आदेश देण्यात आले. तरीही गारेगावचे खंडविकास अधिकारी हरिणखेडे यांनी त्यांच्याकडून वसुली न केल्यामुळे आता ८ मे रोजी पत्र देऊन एफआयआर करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु खंडविकास अधिकारी हरिणखेडे या ११ लाखाच्या अपहारासंदर्भात उदासिन का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. बीडीओसह सहा जणांकडून वसुली गोरेगाव तालुक्याच्या पिंडकेपार येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात ११ लाख रूपयाच्या निधीची अफरातफर करण्यात आली. या प्रकरणात केलेल्या चौकशीत माजी सरपंच मधुकर पटले यांच्यावर ३ लाख ४९ हजार ४२०रूपये १७ पैसे, सडक-अर्जनी तालुक्याच्या डव्वा येथील ग्रामसेवक डव्वा ए.एम.नागदेवे यांच्यावर ९ हजार ६९० रूपये, गोरेगाव तालुक्याच्या तिमेझरी येथील कंत्राटी अभियंता गौरीशंकर बघेले यांच्यावर २ लाख ५४ हजार ८५२ रूपये १७पैसे, सध्या सालेकसा पंचायत समिती अंतर्गत कार्यरत ग्रामसेवक डी.के.बडोले यांच्याकडून ३ लाख ३९ हजार ७३० रूपये १७ पैसे, त्यावेळी गोरेगाव येथे खंडविकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले व सद्या गडचिरोलीच्या चार्मोशी पंचायत समितीत कार्यरत बी.एन.मडावी यांच्याकडून ७३ हजार ५६७ रूपये ५० पैसे, जिल्हा परिषद गोंदियाच्या सामान्य प्रशासन विभागात वरिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत आलोक देसाई यांच्याकडून ७३ हजार ५६७ रूपये ५० पैसे असे एकूण ११ लाख २६ रूपये वसूल करायचे होते. देसाई यांनी २३ डिसेंबर २०१३ ला ७३ हजार ५८० रूपये गोरेगाव येथील मग्रारोहयोच्या खात्यावर जमा केले आहेत. तर कंत्राटी अभियंता गौरीशंकर बघेले यांनी ९ एप्रिल२०१३ ला ३० हजार रूपये बॅक वसूली आॅफ महाराष्ट्र गोरेगाव येथील मग्रारोहयोच्या प्रशासकीय खात्यावर जमा केली आहे.
मग्रारोहयोचे ११ लाख हडपले
By admin | Published: May 11, 2017 12:13 AM