लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी २७ सप्टेंबर नामाकंन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. सोमवारी (दि.७) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील चारही मतदारसंघातून एकूण २४ उमेदवारांनी माघार घेतली. तर अर्जुनी मोरगाव वगळता गोंदिया, आमगाव आणि तिरोडा मतदारसंघात बंडखोरांचे आवाहन कायम आहे. त्यामुळे आता चारही मतदारसंघातून एकूण ४७ उमेदवार रिंगणात आहेत.सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्यातही सर्वच मतदारसंघात बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने बंडोबांना शांत करण्यात पक्षाच्या नेत्यांना कितपत यश येते आणि कोण कोण माघार घेतो, याकडे जिल्ह्यावासीयांचे लक्ष लागले होते. २७ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. ४ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवसापर्यंत एकूण ७६ उमेदवारांनी ११२ नामाकंन दाखल केले होते. ५ ऑक्टोबरला अर्जाच्या छाननीत ५ उमेदवारांचे अर्ज रद्द झाले. त्यामुळे ७१ उमेदवार रिंगणात होते.सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्वांच्या नजरा याकडे लागल्या होत्या. अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील बंडोबांना शांत करण्यात सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांना यश आले.मात्र गोंदिया,आमगाव, तिरोडा मतदारसंघात बंडखोरी कायम असल्याने त्यांचे मन वळविण्यात पक्षाच्या नेत्यांना अपयश आले. सोमवारी अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील २० उमेदवारांपैकी १२ उमेदवारांनी माघार घेतली. यात माणिक घनाडे, विशाल शेंडे, राजेश नंदागवळी, रत्नदीप दहीवले, निशांत राऊत, आनंद जांभुळकर,कैलास डोंगरे,अंजली जांभुळकर,जगन गडपाल,नितीन भालेराव,रिता लांजेवार यांचा समावेश आहे. तर आमगाव मतदारसंघातून डॉ. नामदेव किरसान आणि तिरोडा मतदारसंघातून नरेंद्र रहांगडाले, जगदीश बावनथडे, झामसिंग रहांगडाले, डॉ. नामदेव किरसान या उमेदवारांनी माघार घेतली.गोंदिया मतदारसंघातून इरफान सिध्दीकी,नामदेव बोरकर, प्रदीप वासनिक, प्रफुल भालेराव, बबन शेंडे, रामेश्वर शेंडे, विलास राऊत या उमेदवारांनी माघार घेतली. ७१ पैकी एकूण २४ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता ४७ उमेदवार रिंगणात असून यांच्यात सामना रंगणार आहे.सर्वाधिक उमेदवार गोंदिया मतदारसंघातसोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ७१ पैकी एकूण २४ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे ४७ उमेदवार रिंगणात असून सर्वाधिक १८ उमेदवार गोंदिया विधानसभा मतदारसंघात तर सर्वात कमी ८ उमेदवार अर्जुनी मोरगाव आणि त्यापाठोपाठ आमगाव मतदारसंघात ९ उमेदवार रिंगणात आहेत. तिरोडा विधानसभा मतदारसंघात १२ उमेदवार रिंगणात आहेत.
अखेरच्या क्षणापर्यंत मनधरणीसोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे गोंदिया येथे भाजपचे विनोद अग्रवाल, तिरोडा दिलीप बन्सोड आणि आमगाव मतदारसंघात रामरतन राऊत यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे त्यांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घ्यावे त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न केले. तसेच काही आश्वासने देऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. बंडखोर उमेदवार आपल्या भूमिकेवर कायम असल्याने त्यांची मनधरणी करण्यात पक्षाच्या नेत्यांना अपयश आले.
बंडखोरांचे मन वळविण्यात अपयशअर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ वगळता उर्वरित तीन्ही मतदारसंघात पक्षातीलच बंडखोरांचे आवाहन कायम आहे. गोंदिया विधानसभा मतदारसंघातून भाजप-सेना युतीचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्या विरोधात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल हेअपक्ष म्हणून रिंगणात आहेत. तर तिरोडा मतदारसंघात राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार गुड्डू बोपचे यांच्या विरोधात राष्टÑवादी काँग्रेसचे माजी आ. दिलीप बन्सोड यांचे आव्हान कायम आहे.आमगाव मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार सहषराम कोरोटे यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी आ. रामरतन राऊत यांची बंडखोरी कायम आहे.त्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
दोन माजी आमदार आणि एक माजी जिल्हाध्यक्षभाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या सर्वच पक्षातील बंडखोरांना शांत करण्यात सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत यश आले नाही. बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांमध्ये दोन माजी आमदार दिलीप बन्सोड, रामरतन राऊत आणि एक पक्षाच्या माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांचा समावेश आहे.त्यांच्या बंडखोरीमुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची अडचण होण्याची शक्यता आहे.
दसऱ्यापासूनच प्रचाराचा मुहुर्तउमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २४ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर ४७ उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे लढतीचे अंतीम चित्र स्पष्ट झाले आहे. सर्वच पक्षाचे उमेदवार मंगळवारी विजयादशमीचा मुहुर्त साधत प्रचाराला सुरूवात करणार आहेत.