गोंदिया : नगर परिषद सभापती पदासाठी सोमवारी (दि. १८) ऑनलाईन निवडणूक घेण्यात आली असून यामध्ये कॉँग्रेस, राष्ट्रवादी तसेच बहुजन समाज पक्ष व शिवसेना सदस्यांनी निर्मित केलेल्या गोंदिया नगर विकास आघाडीने हात मिळवणी केली. या प्रयोगानंतर त्यांनी नगर परिषदेतील भारतीय जनता पक्षाच्या हातून सत्ता खेचून घेतली असून सर्व ५ सभापती निवडून आणले आहे. यामुळे नगर परिषदेत आता महाविकास आघाडी राज निर्माण झाले आहे.
११ सदस्यीय विषय समितीत भारतीय जनता पक्षाचे ५, राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे २, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे २ तर बहुजन समाज पक्ष व शिवसेना निर्मित गोंदिया नगर विकास आघाडीचे २ सदस्य आहेत. सोमवारच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी, कॉँग्रेस व आघाडी सदस्यांनी हातमिळवणी केल्यानंतर निवडणुकीत त्यांच्याकडून ६ तर भाजप उमेदवाराला ५ मते पडली व यातून सर्व ५ समित्या भाजपच्या हातून निसटल्या. यानंतर आता सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी नगर विकास आघाडीचे गट नेता राजकुमार कुथे पुन्हा निवडून आले आहेत. तर शिक्षण समिती सभापतीपदी कॉँग्रेसचे सुनील तिवारी, पाणी पुरवठा समिती सभापतीपदी कॉँग्रेसचे भागवत मेश्राम, नियोजन समिती सभापतीपदी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे गटनेता सतीश देशमुख तसेच महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या मालती कापसे निवडून आल्या आहेत.
भाजपकडून सत्ता हिसकावली
मागील निवडणुकीत नगर परिषदेत नगर विकास आघाडीचे २ तर भारतीय जनता पक्षाचे ३ सभापती निवडून आले होते. यंदा मात्र राज्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना महाविकास आघाडीच्या धर्तीवर नगर परिषदेतही कॉँग्रेस, राष्ट्रवादी व नगर विकास आघाडी (बसप-शिवसेना) एकत्र आले. यातूनच या निवडणुकीत भाजपला ५ तर तिघांच्या गटबंधनाला ६ मते पडली. परिणामी त्यांचेच ५ ही सभापती निवडून आले असून भाजपच्या हातची सत्ता त्यांनी हिसकावून घेतली आहे.
स्थायी समितीतून लोकेश यादव यांचा राजीनामा
नगर परिषदेत १० सदस्यी स्थायी समिती आहे. यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, ५ सभापती तसेच सदस्य संख्येच्या आधारावर भाजप, कॉँग्रेस व नगर विकास आघाडीचा प्रत्येकी १ सदस्य आहे. नगर विकास आघाडीकडून समितीत लोकेश यादव सदस्य होते. मात्र सोमवारी त्यांनी न विचारता नाव देण्यात आल्याचे कारण पुढे करून पदाचा राजीनामा दिला आहे.