अभिमन्यू काळे : कनेरी-राम येथे सभेची सांगतालोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : गावात सुविधांची उपलब्धता असणे म्हणजे गाव आदर्श होत नाही तर गावातील प्रत्येक व्यक्ती ही सर्वच प्रकारच्या व्यसनांपासून दूर असली पाहिजे. त्यामुळे आदर्श जीवन पध्दती जगता येईल. आपल्या मुलांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देवून सुसंस्कृत व चांगला नागरिक घडविला पाहिजे. व्यसनमुक्त समाज व मुलांना दर्जेदार शिक्षण देवून आदर्श गाव निर्माण करा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले. सडक-अर्जुनी तालुक्यातील आमदार आदर्श गाव योजनेंतर्गत पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दत्तक घेतलेल्या कनेरी-राम येथील ग्रामपंचायतमध्ये विकास कामांचा आढावा घेताना ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, सरपंच इंदू मेंढे, उपसरपंच प्रेमराज मेंढे उपस्थित होते. जिल्हाधिकारी काळे म्हणाले, गावाच्या शाळेतील जास्तीत जास्त मुले स्कॉलरशीप प्राप्त व नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी पात्र असली पाहिजे. गावाच्या जवळ असलेल्या माजी मालगुजारी तलावातील सुपीक गाळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टाकून शेतीची उत्पादकता वाढवावी व आवश्यक ते मुरूम मिश्रीत गाळ रस्त्याच्या कडेला टाकावी. गावातील नाल्यातून सांडपाणी वाहणार नाही, याची प्रत्येक कुटुंबाने दक्षता घेवून प्रत्येक घरी शोषखड्डे तयार करावे. त्यामुळे हे पाणी भूगर्भात साचून भूगर्भातील पाणीसाठ्यात वाढ होईल. भविष्यात त्यामुळे पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ येणार नाही. गावाच्या परिसरातून वाहणाऱ्या नाल्यावर सिमेंट बंधारे बांधण्यात यावे असे सांगून काळे म्हणाले, त्यामुळे शेतकऱ्यांच्या सिंचनाचे स्त्रोत बळकट होण्यास मदत होईल. कनेरीचे जास्तीत जास्त शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळतील यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करावे. गावातील प्रत्येक कुटुंब कॅशलेस व्यवहार करतील यासाठी त्यांच्या मोबाईलवर भीम अॅप्स लोड करु न घ्यावे. गावात करण्यात येणाऱ्या सर्वच कामांचा दर्जा हा उत्तम राहील याची दक्षता घ्यावी. आरोग्य विभागाचे उपकेंद्र तयार करण्याचा प्रस्ताव विशेष बाब म्हणून शासनाकडे सादर करावे. गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अपूर्ण व मंजूर असलेली कामे वेगाने वेळीच पूर्ण करावी, असेही त्यांनी सांगितले. कनेरी-राम येथे कृषी विभागाने सिमेट बंधारा, भातखाचर, शेततळी, न्यापॅड, गांडूळ खत प्रकल्प युनीट, वनविभागाने साठवण बंधारा, वाचनालय इमारत, रस्त्याचे खडीकरण व सिमेंट रस्ता वैयक्तीक शौचालयाची कामे, पथदिवे, तलाव खोलीकरणाची कामे, शेतकर्यांच्या पंपासाठी ट्रान्सफार्मर, गॅस सिलेंडरचे वाटप, आरोग्य शिबीर, समाधान शिबिराच्या माध्यमातून प्रमाणपत्राचे, गाई-म्हशी, शेळ्यांचे वाटप करण्यात आल्याची माहिती देवून मंजूर व प्रस्तावित असलेल्या कामाची माहिती सहायक गटविकास अधिकारी झामिसंग टेंभरे यांनी दिली. जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील व प्रेमदास धांडे यांच्या घरी तयार करण्यात आलेल्या शोषखड्ड्याचे तसेच वन विभागाने लावलेल्या मिश्र रोपवनाची पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी सभेत ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या. सभेला विविध यंत्रणाचे जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार उपसरपंच प्रेमराज मेंढे यांनी मानले.
व्यसनमुक्त समाज व गाव आदर्श करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2017 1:08 AM