केशोरी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी येथे वनपरिक्षेत्र कार्यालयाने जळावू लाकडाच्या बिट्या अंत्यसंस्कारासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी अर्जुनी मोरगाव तालुका शिवसेनाप्रमुख चेतन दहीकर यांनी मागणी केली आहे.
वनपरिक्षेत्र कार्यालय गोठणगावअंतर्गत सहवन परिक्षेत्र केशोरी, परसटोला, राजोली येत असून, या ठिकाणी केव्हाच जळावू लाकडाच्या बिट्या उपलब्ध राहत नाही. त्यामुळे गावातील निधन झालेल्या व्यक्तीसाठी अंत्यसंस्कार करण्यासाठी जळावू लाकडे आणावी कुठून? असा ज्वलंत प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी अनेकदा संबंधित विभागाला विनंती करण्यात आली आहे. परंतु याकडे संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा लक्ष दिले नाही. गावाला लागून असलेल्या जंगलातून जळावू लाकडे आणण्यासाठी बंदी असल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असणारी जळावू लाकडांची अडचण नागरिकांसमोर निर्माण झाली आहे. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन किमान ५० टन जळावू लाकडांच्या बिट्या सहवन कार्यालय केशोरी, परसटोला, राजोली येथे उपलब्ध ठेवण्याची व्यवस्था वनपरिक्षेत्र अधिकारी गोठणगाव यांनी करावी, अशी मागणी तालुका शिवसेनाप्रमुख चेतन दहीकर यांनी केली आहे.