आमगाव : तालुक्यातील मुख्य रस्ता असलेल्या आमगाव-कामठा रस्त्याला दत्तक घेऊन दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी करीत कामठा मार्ग संघर्ष समितीच्या वतीने माजी आमदार संजय पुराम यांच्यामार्फत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना रविवारी (दि.१९) निवेदन देण्यात आले.
महामार्ग क्रमांक-३६५ कामठा-आमगाव येथील ३० किमी. रस्त्याची जर्जर अवस्था झाली आहे. यामुळे कित्येकांचा जीव जावून कुटुंब उघड्यावर आले असून, कित्येकांना अपंगत्व आले आहे. त्यामुळे आमगाव येथील कामठा मार्ग संघर्ष समितीने राज्य सरकारला निवेदनाद्वारे अनेकदा कळविले, पण रस्ता नव्याने करण्यात आला नाही. त्यामुळे माजी आमदार पुराम यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घालून दिली. यावेळी मंत्री गडकरी यांनी सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी कामठा मार्ग संघर्ष समितीचे राजीव फुंडे, मुरली भूते, राम चक्रवर्ती, महेंद्र राहांगडाले, दुर्गेश गौतम, अनिल येरणे उपस्थित होते.