सालेकसा : शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची थेट विक्री करून जास्त नफा घेण्याला प्रथम प्राधान्य द्यावे, असे आवाहन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक शिवकुमार पुस्तोडे यांनी सालेकसा तालुक्यातील शेतकऱ्यांना केले आहे.
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित रयतबाजार मोहिमेप्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकरीवर्ग मोठ्या काटकसरीने आपल्या शेतात व मळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, फळे व फळभाज्या उत्पादित करतात. त्या उत्पादनाला व्यापारी निम्म्या किमतीत उचल करून दोन-तीन पटीने जास्त विक्री करून मोठा नफा कमवतात. यात शेतकऱ्यांना मोठे नुकसान होते. सोबतच ग्राहकांच्या खिशातूनसुद्धा जास्त पैसे जातात. अशात जर शेतकऱ्याने थेट विक्री करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळेल व त्याला नफा होईल. सोबत ग्राहकांचे काही प्रमाणात पैसे वाचतील. ही बाब विचारात घेऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी सालेकसा येथे थेट विक्रीचा रयत बाजार तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर भरविण्यात आला. कोरोना नियमांचे पालन करीत मास्क आणि सोशल डिस्टंन्सिंग राखून तालुक्यातील शेतकरी या रयत बाजारात सहभागी झाले व त्यांनी आपल्या शेतमालाची दुकाने थाटली. या दुकानातून अनेक ग्राहकांनी भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी केल्या. या रयत बाजाराला तालुका कृषी अधिकारी अजिंक्य दुधाणे व इतर अधिकाऱ्यांनी भेट दिली. कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना इलेक्ट्राॅनिक वजन काटे आणि छत्र्या अनुदानावर देण्यात आल्या.