राजकुमार बडोले : जिल्हा खनिज प्रतिष्ठान सभा गोंदिया : रेतीघाटामुळे आणि खाणीमुळे बाधित होणाऱ्या गावाच्या विकासासाठी गौण खनिज स्वामित्व निधीचा योग्य वापर व्हावा, असे निर्देश जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या संचालन परिषदेचे अध्यक्ष तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या संचालन परिषदेची सभा नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सभेला समितीचे सचिव तथा जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा खनिकर्म अधिकारी भीमराव फुलेकर, नामनिर्देशित सदस्य संतोष चव्हाण, लिखेंद्र बिसेन, जयंत शुक्ला, धनंजय वैद्य यांच्यासह अन्य सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, जिल्हा खनिज प्रतिष्ठानसाठी कर्मचारी आणि लेखा परीक्षकांची नियुक्ती करताना शासनाच्या निर्देशाचे पालन करावे. बाधित क्षेत्रामुळे ज्या व्यक्ती बाधित होतील त्यांचे योग्य पुनर्वसन करावे. विस्थापित कुटुंबांना वाजवी भरपाई द्यावी. जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीचा विनियोग उच्च प्राथमिकतेच्या बाबीवर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय खनिज विकास निधी मागणीचे प्रस्ताव संबंधित लोकप्रतिनिधीकडून मागविण्यात यावे, असेही बडोले यांनी यावेळी सांगितले. सन २०१६-१७ या वर्षात २० मार्च २०१७ पर्यंत जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत जिल्ह्यातील आठही तालुक्यातून ७५ लाख २६ हजार २५५ रूपये जमा झाल्याची माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी फुलेकर यांनी दिली.(प्रतिनिधी)
बाधित क्षेत्रासाठी निधीचा योग्य वापर करा
By admin | Published: April 01, 2017 2:40 AM