अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना भंडारा जिल्ह्यातील रेतीघाटांवरून विनामूल्य रेती उपलब्ध करून देण्याची माजी जि.प. सदस्य किशोर तरोणे यांनी खा. प्रफुल्ल पटेल यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे.
शासनाने घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास विनामूल्य रेती उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, अर्जुनी मोरगाव तालुक्यात एकही रेतीघाट नाही. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना अवैध रेतीतस्करी करणाऱ्या माफियांकडून दुप्पट दराची रेती खरेदी करावी लागत आहे. सध्या या रेतीचे भाव गगनाला भिडले असून सहा हजार रुपये प्रतिब्रास हा दर आहे. यात सर्वसामान्य गोरगरीब लाभार्थ्यांची लूट होत आहे. रेती उपलब्ध न झाल्यामुळे कित्येक लाभार्थ्यांचे घरकुलाचे बांधकाम बंद पडले आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील लाभार्थ्यांना भंडारा जिल्ह्यातील सानगडी, सासरा, दिघोरी या नजीकच्या घाटांवरून प्रत्येकी पाच ब्रास रेती उचल करण्याची परवानगी द्यावी, असे पत्र खा. पटेल यांना दिले आहे. गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांना ई-मेलद्वारे सूचित करण्यात आले असल्याची माहिती तरोणे यांनी दिली.