कपिल केकत - गोंदियामागील १० दिवसांपासून विराजलेल्या गणरायाला निरोप देण्यासाठी गोंदियासह संपूर्ण जिल्ह्यात रविवारपासूनच विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या. जिल्ह्यात सार्वजनिक मंडळांसह हजारोंच्या संख्येत घरगुती गणेशोत्सव साजरा केला जाते. सोमवारी अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर सर्वांनीच गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी ठिकठिकाणच्या जलाशयांवर (बोडी) गर्दी केली होती. यावेळी मुर्त्यांसह १० दिवसांचे निर्माल्यही पाण्यात विसर्जित करण्यात आले. यामुळे नदी व तलावांचे काठ निर्माल्याने माखून गेल्याचे चित्र दिसून आले. या प्रकारामुळे पाणी प्रदूषित होत असून याचे मानवासह पशुंवरही दुष्परिणाम जाणवणार आहेत. यावर सामाजिक संस्था किंवा पर्यावरणप्रेमी संस्थांनी पुढाकार घेत जागृती करून हा धोका टाळण्याची गरज होती. परंतू या संस्थांकडून अशा प्रकारचे उपक्रम हाती घेण्यात आल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे निर्माल्याचा सदुपयोग करणे अशक्य होण्यासोबतच परिसरात दुर्गंधी सुटली आहे.गणरायाला आवडणारे दुर्वांकुर, पूजेचे साहित्य, नैवेद्य, हार, फुलं आदी साहित्याचा निर्माल्यात समावेश होतो. निर्माल्य पायदळी येऊ नये किंवा रस्ते व नाल्यांत टाकू नये, त्यांना पाण्यात विसर्जित करावे अशी परंपराच चालत आहे. ही परंपरा आजही चालत असून गणरायाच्या मुर्तीसह मोठ्या प्रमाणात निर्माल्यही नदी व तलावांत विसर्जीत केले जात आहे. शनिवारपासूनच शहरात गणपती विसर्जनाला सुरूवात झाली आहे. गोंदियात मुर्ती विसर्जनासाठी नागरिकांची छोटा गोंदिया, पांगोळी नदी, देव तलाव, नाग तलाव (साई मंदीर), सिव्हील लाईन बोडी, सरकारी तलाव, रजेगाव बाघ नदी, खमारी येथे गर्दी असते. एकट्या शहर व लगतच्या ग्रामीण भागातील हजारोंच्या संख्येत सार्वजनिक मोठ्या व खाजगी लहान-लहान मूर्त्यांचे विसर्जन केले जाते. गणरायाला निरोप देताना १० दिवसांत गोळा झालेले निर्माल्यही सोबत विसर्जीत केले जाते. अगोदरच मुर्त्यांच्या माती व रंगापासून पाणी दूषीत होते. त्यात या प्रकारामुळे अधिकची भर पडते. निर्माल्यातील साहित्य पाण्यात कुजून पाणी प्रदूषणास हातभार लागतो. यातूनच पाण्याला व परिसरात दुर्गंधी सुटते.निर्माल्यप्रती हिंदू धर्मीयांची आस्था असणे स्वाभाविक आहे. मात्र हे निर्माल्य पाण्यात न घालता एका ठिकाणी जमिनीत खड्डा करून गोळा करून त्यातून खत निर्मिती करता येते. हे खत शेतात किंवा घरातील बाग व कुंड्यांसाठी उपयोगी आणले जाऊ शकते. असे केल्यास भावनाही दुखावणार नाहीत व निर्माल्याचा सदुपयोग होऊ शकतो. सर्वसामान्य माणूस मात्र याकडे कानाडोळा करतो व माझ्या एकट्याच्या निर्माल्याने तलाव दूषीत होणार नाही, असा विचार करून निर्माल्य विसर्जीत करून मोकळा होतो.
गणरायांच्या निर्माल्याने माखली जलाशये
By admin | Published: September 09, 2014 12:27 AM