गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा, गोंदिया,आमगाव व अर्जुनी मोरगाव या चारही मतदार संघात भाजपने बाजी मारत सत्ता मिळवली आहे. तिरोडा मतदारसंघातून भाजपाचे विजय रहांगडाले ४२६२८ मतांनी विजयी झाले आहेत त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रविकांत बापाचे निवडणुकीत उभे होते. आमगाव मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार राजकुमार पुराम यांना पराभूत करून भाजपाचे उमेदवार संजय पुराम ३३६११ मतांनी विजयी झाले आहेत. गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे महायुतीतील भाजपचे उमेदवार विनोद अग्रवाल यांचा काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल यांच्या विरुद्ध ६१००९ मतांनी विजय झाला आहे. तर अर्जुनी मोरगाव मतदार संघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार राजकुमार बडोले सुद्धा आघाडीवर असल्याने जिल्ह्यात भाजपचेच सरकार येणार हे स्पष्ट झाले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोंदिया जिल्ह्यात निवडणूक प्रचारात आले होते. भाजपच्या पक्षश्रेष्टींनीं आकलनातून कधी नव्हे ते गोंदिया जिल्ह्यातील चारही मतदार संघात सत्ता राखण्याचे यश मिळवले आहे. यावर्षीचे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल राज्यातील अनेक राजकीय उलथापालथींच्या पार्श्वभूमीवर आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीला बहुमत मिळाले होते. शिवसेनेने भाजपशी युती तोडत राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. त्यानंतर २०२२ मध्ये शिवसेना पक्ष फूट आणि २०२३ ला राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर भाजपसोबतचे महायुतीचे सरकार महाराष्ट्राला लाभले आहे. त्यामुळे या निवडणुकीत मिळालेल्या भाजपच्या यशाने विरोधकांसोबतच युतीतील नेत्यांचेही डोळे पांढरे झाले असतील यात काही शंका नाही.